26.9 C
Latur
Tuesday, March 2, 2021
Home कोरोना संकटातून राष्ट्रवादाला बळकटी

कोरोना संकटातून राष्ट्रवादाला बळकटी

एकमत ऑनलाईन

सध्या राष्ट्रवादाचा बोलबाला भलताच वाढला आहे़ ‘वंदे मातरम्’ आणि ‘भारत माता की जय’ या गोष्टींनी देशभरातले वातावरणच बदलून टाकले आहे़ भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी एक विधान केले़ त्यावरूनही बराच वाद उठला़ मनमोहन सिंग म्हणाले, ‘भारत माता की जय’ चा सध्या अतिरेकच होतोय़ पंतप्रधान मोदी असोत की आणखी कोणी, ‘भारत माता की जय’ या घोषणेनेच आपल्या भाषणाची सुरुवात करतात आणि ‘वंदे मातरम्’ने सांगता करतात. हे जरा अतीच होतेय, असे काही जणांना वाटते.

मातृभूमी, पितृभूमी या शब्दाचा वापर कसा केला जातो तर एका विशिष्ट प्रदेशाशी, देशाशी, भूभागाशी आपला संबंध, नाते दाखविण्यासाठी हे भावनिक वातावरण निर्माण करणारे शब्द असतात आणि एखादे परकीय संकट देशावर आले की त्याचा वापर देश भावनिकदृष्ट्या एकत्रित बांधून ठेवण्यासाठी होतो ही खरीच बाब आहे़ ‘भारत माता’ची कल्पना आपल्याकडे ब्रिटिश सत्तेविरोधात जेव्हा स्वातंत्र्याचा लढा सुरू होता तेव्हा लोकप्रिय झाली़ स्वदेशी चळवळ ही देखील त्याच कल्पनेचा भाग होती.

बंगालमधील एका कलाकाराने त्या काळात भारत मातेला भगव्या वस्त्रांकित पोशाखात दाखविले़ तिला चार हात होते आणि त्या हातामध्ये सगळ्या स्वदेशी बनावटीच्या वस्तू होत्या़ त्यांनी संस्कृती आणि आपले रीतीरिवाज या संदर्भातला एक संदेश त्या प्रतिमेद्वारे जनतेत देण्याचा प्रयत्न केला़ भक्ती, परिश्रम, ज्ञान अशा गुणांनी युक्त अशी ही भारत मातेची प्रतिमा त्या काळात पुढे केली गेली़ तिच्या चेह-यावर शांत, अहिंसक, सात्विक अशा स्वरूपाचे भाव होते़ एक प्रकारचे मानवनिष्ठ भारतीयत्व, अशी प्रतिमा या भारत मातेची त्या काळी होती.

आणि अशा प्रकारची भारतीयत्वाची भावना भारतासारख्या विविधतेने भरलेल्या देशात उपयुक्तच होती़ समाजातील सर्वच घटकांना न्याय देणे, बरोबर घेऊन चालणे, यासाठी हे त्या काळात गरजेचेही होते़ देशात राहणाºया सर्व लोकांना सोबत घेऊन आपण जाणार नसू तर अशा प्रकारच्या राष्ट्रीय प्रतिमा काही उपयोगाच्या नसतात ही सुद्धा खरीच गोष्ट आहे़ आताच्या काही विचारवंतांच्या मते आता ज्या ‘भारत माता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ च्या घोषणा दिल्या जातात त्यामागे एक प्रकारचे हिंसक राष्ट्रीयत्व जाणवते आणि म्हणून समाजातल्या सर्वच घटकांचे समर्थन त्यासाठी मिळणे कठीण जाईल़ विविधता हेच भारताचे सामर्थ्य आहे, वगैरे युक्तिवाद या तर्कापाठीमागे केला जातो.

स्वातंत्र्य चळवळीतून समोर आलेली जी राष्ट्रीयत्वाची भूमिका ही एकमेकांविषयी विश्वास निर्माण करणारी होती़ त्या काळातल्या राजकीय पुढाºयांनी ही कल्पना अनेक प्रतीकांतून उभी केली होती़ भारत माता किंवा मातृभूमी ही संकल्पना त्या सर्वांच्या केंद्रस्थानी होती़ ‘भारत माता की जय’ ही घोषणा म्हणजे ‘आपल्या मातृभूमीचा विजय असो’ या अर्थाने अभिप्रेत होती़ त्यातूनच मग सांस्कृतिक विविधता, चालीरीती, भाषा आदींनी युक्त तरीही एक असलेला भारत देश हा जगासाठी एक आदर्श उदाहरण ठरला.

भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी या संदर्भातले विवेचन खूपच सुंदर रीतीने केलेले आहे़ खानपान, चालीरीती, भाषा, सण-उत्सव, परंपरा अशा सर्वच बाबतीत भारतामध्ये विविधता आहे़ मात्र, एका आणखी निराळ्याच वैशिष्ट्याने मी भारावून गेलेलो आहे़ पंडित नेहरू हे महान साहित्यिक देखील होते़ त्यांचा ‘डिस्कव्हरी आॅफ इंडिया’ हा ग्रंथ जागतिक वाङ्मयात मानाचे स्थान मिळवून आहे. ते लिहितात, कितीही विविधता, भिन्नता यांनी आम्ही विभागलेले असलो तरी आमचा आत्मा एक आहे हे विसरता कामा नये़ अधूनमधून मला त्याचा प्रत्यय येतो़ हे सारे खूप प्राचीन आहे.

विचारांच्या लाटाच लाटा आमच्या देशात उसळत असतात परंतु त्या साºया विचारांची पातळी कितीही वर-खाली होत असली तरी अंतिमत: सर्व विचार एकाच ठिकाणी येऊन थांबतात आणि तो म्हणजे आमचा आत्मा एकच आहे़ काश्मीर ते कन्याकुमारी आपण सर्वजण कुठल्यातरी एकाच सांस्कृतिक बंधनाने बांधलेले आहोत आणि ही भावना आमच्या अंतर्मनातल्या कप्प्यात खोलवर साचलेली असते़ ‘भारत माता की जय’ या घोषणेतून अंतर्मनात लपलेल्या आपल्या आत्म्याचाच एक प्रकारे शोध घेतला जातो़ पंडित नेहरूंचे हे विचारच आज वेगवेगळ्या प्रकारे मांडले जात आहेत.

मात्र, व्होट बँकेचे राजकारण नंतरच्या काळात अतीच झाले आणि त्याचे रूपांतर कुठल्यातरी एका जाती-धर्माचे लांगुलचालन राजकीय स्वार्थापोटी केले गेले़ आज लोकांच्या मनात जो द्वेष निर्माण होत आहे त्याचेही बीज याच लांगुलचालनात आणि राजकारणात आहे़ आश्चर्य म्हणजे कोरोनाचे वैश्विक संकट सध्या निर्माण झालेले असतानाही भारतात राष्ट्रवादाचे प्राबल्य वाढलेले जाणवते़ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाला आधी टाळ्या, थाळ्या वाजवून कोरोनाशी लढणा-या डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस यांना प्रोत्साहन देण्याची कल्पना मांडली.

जनतेने एकजुटीने प्रतिसाद दिला़ नंतर दिवे लागणी आणि लष्करांकडून मानवंदना, याही गोष्टींचे जगभर कौतुक झाले़ सारा देश एकवटला आणि आता वीस लाख कोटींचे आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानसाठी़ म्हणजे पुन्हा राष्ट्रवादाला बळकटी आली़ अर्थात कोरोनावर मात करण्यासाठी हे ही आवश्यकच आहे़

अ‍ॅड. प्रभाकर येरोळकर लातूर, मोबा: ९८६०४ ५५७८५

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,439FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या