पुणे : राज्याची लाईफलाईन म्हणून ओळख असलेली लालपरी आता नव्या रूपात प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यातील पहिली इलेक्ट्रिक बस ‘शिवाई’ प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली आहे. एसटी महामंडळाच्या स्थापना दिनाच्या दिवशी शिवाई बसचा लोकार्पण सोहळा पार पडला. एसटी महामंडळातील पहिली एसटी इलेक्ट्रिक बस पुणे-अहमदनगर दरम्यान धावणार आहे.
विधान परिषदेच्या उपाध्यक्ष डॉ. नीलम गो-हे, उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री अनिल परब, एसटी मंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत आज लोकार्पण सोहळा पार पडला. या लोकार्पण सोहळ्यात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, राज्यात १९३२ मध्ये खासगी सेवा सुरू झाली होती. त्यानंतर एक जून १९४८ मध्ये एसटी महामंडळाची बस धावली. परदेशांमधील बसेसप्रमाणे ही नवीन बस असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. काही दिवसांपूर्वी एसटी कर्मचा-यांचा संप झाला.
नंतर त्याला मार्ग मिळाला. पण आता याला कोणाची दृष्ट लागू देऊ नका, असे आवाहनही अजित पवार यांनी केले. राज्यात टप्प्याटप्प्याने शिवाई बसेस सुरू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले.
पुणे-नगर असा खासगी कारने प्रवास करणारेदेखील शिवाई बसने प्रवास करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या दोन वर्षांपासून लॉकडाऊनच्या काळात एसटीला मोठी किंमत मोजावी लागली. एसटीचे उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकारने मार्ग शोधले आहेत. राज्य सरकार एसटी महामंडळासोबत असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली.
पुण्यातील शंकर शेठ रोडवरील एसटी महामंडळ विभागाचे पुणे विभागीय कार्यालय आहे. या कार्यालयाच्या आवारात असलेल्या वडाच्या झाडापासून १ जून १९४८ रोजी पुणे ते अहमदनगर अशी बस धावली होती. या प्रवासाला आज ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याचा मुहूर्त साधत एस.टी विभागामार्फत पुणे ते अहमदनगर ‘शिवाई इलेक्ट्रिक’ बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत झाले आहे.
या इलेक्ट्रिक बसची वैशिष्ट्ये
शिवाई इलेक्ट्रिक बसची लांबी १२ मीटर आहे. आतील बाजूस २ आणि बाहेरील बाजूस १ असे कॅमेरे आहेत. या बससाठी १० बॅटरी असून एकदा चार्ज केल्यावर २०० ते २५० किलोमीटर धावणार आहे. या बसमधील आसनक्षमता ४३ प्रवाशांची आहे. ध्वनी व प्रदूषणविरहित तसेच वातानुकूलित बस असणार असून प्रवाशांना गारेगार प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. ही बस ताशी ८० कि.मी. वेगाने धावणार आहे. ‘शिवाई’च्या पुणे-अहमदनगर-पुणे मार्गावर दिवसाला ६ फे-या होणार आहेत.