लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ब्रिटिश संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बचाव करताना बीबीसीच्या डॉक्युमेंटरीमध्ये दाखवण्यात आलेल्या माहितीशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी ब्रिटिश संसदेत या वादग्रस्त डॉक्युमेंटरीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर ऋषी सुनक यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील ही डॉक्युमेंटरी म्हणजे पक्षपाती आणि अपप्रचार करणारी असल्याचे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
गुजरात दंगलीवेळी त्यावेळचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर भूमिकेवर टीका करणारी एक डॉक्युमेंटरी बीबीसीने प्रसारित केली आहे. त्यानंतर यावरुन वाद निर्माण झाला असून हा विषय ब्रिटनच्या संसदेतही उपस्थित करण्यात आला. बीबीसीच्या अहवालावर पाकिस्तानी वंशाचे खासदार इम्रान हुसैन यांनी प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषी सुनक म्हणाले की, याबाबत ब्रिटन सरकारची भूमिका स्पष्ट आहे आणि त्यात कोणताही बदल झालेला नाही. ज्या ठिकाणी अन्याय होतोय त्या विरोधात आम्ही नेहमीच भूमिका घेतली आहे. पण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंबंधित या डॉक्युमेंटरीमध्ये मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्याच्याशी मी त्यांच्याशी अजिबात सहमत नाही.
भारताकडून बीबीसीवर पक्षपातीचा आरोप
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही बीबीसीच्या वृत्तावर प्रतिक्रिया व्यक्त करत ही डॉक्युमेंटरी पूर्णपणे पक्षपाती असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारने ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या गुजरात दंगलीवरील माहितीपटाला प्रचाराचा एक भाग असल्याचं संबोधलं. अशा चित्रपटाचे उदात्तीकरण करू शकत नाही असे सरकारने म्हटले आहे. सरकारच्या वतीने असे सांगण्यात आले की बीबीसीचा पंतप्रधानांवरील माहितीपट अपप्रचार, पक्षपाती आणि वसाहतवादी मानसिकता दर्शवतो आणि आम्हाला माहित नाही की त्यामागील अजेंडा काय आहे?