गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गडचिरोलीत १२ लाख रुपये बक्षीस असलेल्या दोन जहाल माओवाद्यांनी आत्मसमर्पण केलं आहे.रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम, आणि माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजू मट्टामी अशी या दोन जहाल माओवाद्यांची नावे आहेत. त्यांनी आज पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या समोर आत्मसमर्पण केले आहे.
रामसिंग ऊर्फ सिताराम बक्का आत्राम हा २०१२ ते मार्च २०२२ पर्यंत भामरागड एरीया टेक्नीकल दलममध्ये एसीएम पदावर कार्यरत होता. रामसिंगवर १खून, १ चकमक आणि इतर १ असे एकूण ३ गुन्हे दाखल आहेत. रामसिंग हा मौजा कासमपल्ली, गुंडुरवाही, हीकेर, आशा-नैनगुडा, आलदंडी येथील चकमकीत सहभागी होता.
माधुरी ऊर्फ भुरी ऊर्फ सुमन राजु मट्टामी ही फेब्रुवारी २०१३ ते एप्रिल २०२२ पर्यंत पेरमिली दलामध्ये एसीएम पदावर कार्यरत होती. माधुरीवर ४ खून, २१ चकमक, ७ जाळपोळ आणि इतर ५ असे एकूण ३७ गुन्हे दाखल आहेत. ती मौजा वेळमागड, कसनासुर व माडवेली चकमकीमध्ये सहभागी होती.