मुंबई : सध्या कोरोनाचे सावट कमी होत असताना मंकीपॉक्स या आजाराने डोके वर काढले आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण कोरोनाचा सामना करतोय. अशात नव्याने पुन्हा आलेल्या मंकीपॉक्स आजाराने जगाची चिंता वाढवली आहे. ब्रिटनसह युरोपीय देशांनंतर आता अमिरेकेतही याचे रुग्ण आढळले होते मात्र आता भारतातसुद्धा मंकीपॉक्सचा रुग्ण आढळल्याची माहिती समोर आली आहे.
संयुक्त अरब अमिराती या देशातून केरळात येणा-या एका व्यक्तीमध्ये मंकीपॉक्सची लक्षणे आढळल्याची माहिती केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी दिली. हा व्यक्ती तीन दिवसांआधी केरळमध्ये आला. या व्यक्तीच्या चाचण्या केल्या असून याचे नमुणे पुणे व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूटमध्ये पाठविण्यात आले.
मे महिन्याचत युरोप आणि उत्तर अमेरिकेतील काही देशांत मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर मंकीपॉक्सच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्पेन, पोर्तुगाल, कॅनडा आणि इंग्लंडमध्ये अलर्टसुद्धा जारी करण्यात आला.
मंकीपॉक्स नावाचा आजार जगभरात वेगाने पसरत आहे. या विषाणूने जगातील अनेक देशांमध्ये कहर केला असून हा आजार माकडांसारख्या संक्रमित जिवांपासून मानवामध्ये पसरत आहे त्यामुळे या आजाराला मंकीपॉक्स असे नाव देण्यात आले आहे.
मंकीपॉक्स संक्रमित प्राण्याने घेतलेल्या चाव्यामुळे किंवा रक्त किंवा शरीरातील घटकांमुळे पसरते. उंदरांमुळेही हा रोग पसरत असल्याचे मानले जाते. सोबतच नीट शिजवलेले नसलेल्या संक्रमित प्राण्याचे मांस खाल्ल्यानेही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते.