कळमनुरी : काँग्रेसचे दिवंगत आमदार राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधान परिषद आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर बुधवारी रात्री हल्ला झाल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रज्ञा सातव यांनी स्वत: या प्रकाराची माहिती दिली आहे.
या घटनेवरून तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर आरोपीचे आई-वडील थेट प्रज्ञा सातव यांच्या ‘कोहिनूर’ या निवासस्थानी त्यांच्या भेटीसाठी दाखल झाले . ‘यावेळी ताईंनी त्याला माफ करावे’ असे म्हणत आरोपी महेंद्र डोंगरदिवेच्या आईला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, एकीकडे प्रज्ञा सातव यांच्यावरील या हल्ल्याचा विरोधी पक्षांकडून आणि अनेक नेतेमंडळींकडून निषेध केला जात असताना दुसरीकडे प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आरोपी महेंद्र डोंगरदिवेचे आई-वडील पोहोचले. महेंद्र कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, असे म्हणताना महेंद्रच्या आईला अश्रू अनावर झाले. त्याला माफी द्यावी, अशी मागणी त्यांनी वारंवार केली.
‘ताईंकडे आम्ही मागणी करायला आलोय. माफ करा म्हणतोय. आम्ही माफी मागतो. त्याची लहान लहान मुले घरी रडतायत. त्याने केले ते खूप चुकीचे आहे. याआधी त्याने असे कधीच काही केले नाही. आमचा मुलगा काही कमवत नाही. आम्ही त्याला खूप बोललो. पण आम्हाला एकदा माफ करा. या वेळी एकदा क्षमा करा’’, असे महेंद्रची आई वारंवार म्हणत असल्याचे दिसून आले.
बुधवारी डॉ. सातव या दिनक्रमानुसार कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथे गेल्या होत्या. रात्री त्या गावात पोहोचल्या तेव्हा कारमधून उतरत असताना एक व्यक्ती त्यांच्या पाठीमागून आला अन् अचानक त्यांना बाजूला ओढून चापट मारली. त्यानंतर आरोपीवर गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी शेळ्या वळण्याचे काम करतो
हल्ला करणारा महेंद्र डोंगरदिवे शेळ्या वळण्याचे काम करत असल्याची माहिती त्याच्या आईकडून समोर आली आहे. शेळ्या वळून, काम करून आम्ही घर चालवतो. आमच्यावर अशी वेळ कधी आली नव्हती. आम्ही मान्य करतो की त्याने चूक केली. ताईंच्या पाया पडतो आम्ही. माझ्या लेकराला यावेळी माफ करा. दोन-तीन दिवसांपासून घरात कुणी जेवलं नाही. त्याची मुलं लहान लहान आहेत. आमची सून भातशेतावर कामाला जाते’’, अशा शब्दांत महेंद्रच्या आईने आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.