न्यूयॉर्क : जगातील टॉप-५० सर्वात नाविन्यपूर्ण कंपन्यांच्या यादीत टाटा समूहाच्या नावाचा समावेश झाला आहे. विशेष म्हणजे या यादीत ही एकमेव भारतीय कंपनी आहे.
बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपची सर्वाधिक नाविन्यपूर्ण कंपन्यांची २०२३ यादी नुकतीच प्रसिद्ध झाली. यामध्ये टाटा समूह २० व्या क्रमांकावर आहे. ही यादी दरवर्षी बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपद्वारे प्रसिद्ध केली जाते. यामध्ये जगभरातील कंपन्यांची कामगिरी, त्यांची क्षमता आणि नाविन्य यासह इतर अनेक बाबी तपासल्या जातात आणि या आधारावर त्यांना यादीत स्थान दिले जाते.
देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाने या सर्व बाबींवर चांगली कामगिरी करून हे स्थान प्राप्त केले आहे. स्वातंत्र्यापूर्वी सुरू झालेल्या कंपन्यांमध्ये टाटा समूहाचे नाव अग्रस्थानी येते. मीठापासून ते आलिशान गाड्या बनवणा-या या समूहाचा व्यवसाय १८६८ मध्ये सुरू झाला. आज आयटी क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी ळउर, मेटल क्षेत्रातील टाटा स्टील, टाटा मोटर्ससह इंडियन हॉटेल कंपनी या समूहाचा भाग आहेत.
टॉप-३ रँकिंगमध्ये या कंपन्यांची नावे
आयफोन बनवणारी अमेरिकन कंपनी अॅपल टॉप-५० मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. जगातील दुसरा सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांची इलेक्ट्रिक कार कंपनी टेस्लाला स्थान देण्यात आले आहे. यादीत तिस-या क्रमांकावर अॅमेझॉन आहे, ज्याचे नेतृत्व जेफ बेझोस करत आहेत, गेल्या वर्षी जाहीर झालेल्या यादीत टेस्ला तिस-या क्रमांकावर होती, आता कंपनीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.
इतर कंपन्यांनाही मिळाले स्थान
यादीत समाविष्ट असलेल्या इतर मोठ्या कंपन्यांमध्ये गुगूलची मूळ कंपनी अल्फाबेट चौथ्या क्रमांकावर आहे, तर अब्जाधीश बिल गेट्सची मायक्रोसॉफ्ट पाचव्या क्रमांकावर आहे. अमेरिकन फार्मा कंपनी मॉडर्ना सहाव्या, दक्षिण कोरियाची सॅमसंग सातव्या, चिनी कंपनी हुआवे आठव्या क्रमांकावर आहे. बीवायडी कंपनीला नवव्या क्रमांकावर तर सीमेन्सला दहाव्या क्रमांकावर ठेवण्यात आले आहे. मोस्ट इनोव्हेटिव्ह कंपन्यांच्या २०२३ च्या यादीत समाविष्ट असलेल्या इतर कंपन्यांमध्ये फार्मा कंपनी फायझर, स्पेसएक्स, फेसबुक (मेटा), नेस्ले, वॉलमार्ट, अलीबाबा आणि इतर कंपन्यांना त्यात स्थान देण्यात आले आहे.