विशाखापट्टणम : विशाखापट्टणममध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुस-या एकदिवसीय सामन्यात स्टार फलंदाज असलेला भारतीय संघ अवघ्या 117 धावांत ऑलआऊट झाला आहे. भारताने ऑस्ट्रेलियासमोर 118 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघ 26 षटकांत मिचेल स्टार्कच्या कहरसमोर 117 धावांवर गारद झाला.
भारताकडून विराट कोहलीने सर्वाधिक ३१ धावा केल्या. अक्षर पटेल 29 धावा करून नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्कने ५३ धावांत ५ बळी घेतले तर शॉन अॅबॉटने 23 धावांत दोन बळी घेतले. संपूर्ण भारतीय संघ केवळ 26 षटकेच खेळू शकला यावरून ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज किती वरचढ होते, याचा अंदाज येतो. भारतीय भूमीवर टीम इंडियाची ही चौथी सर्वात कमी धावसंख्या आहे.