नवी दिल्ली : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण झाली. भारताला १ जुलैपासून इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील शेवटचा सामना खेळायचा आहे, जो गेल्या वर्षी कोरोनामुळे होऊ शकला नव्हता, पण यावेळीही हा सामना कोरोनाच्या सावटाखाली आहे.
शनिवारी झालेल्या सराव सामन्यात रोहित शर्माने फलंदाजी केली नाही. यामागचे कारण कोणालाच समजले नाही, कारण रोहित फार चांगल्या फॉर्ममध्ये नाही आणि लयीत परतण्यासाठी सराव सामना आवश््यक आहे, मात्र रात्री उशिरा त्याला कोरोनाची लागण झाल्याचे सांगण्यात आले.
रोहित कोविड-१९ पॉझिटिव्ह असण्याचे प्रमुख कारण म्हणजे कोरोना काळात घेतलेला निष्काळजीपणा आहे. बीसीसीआयने नुकताच बायो बबल काढण्याचा निर्णय घेतला होता, त्यानंतर खेळाडू कोरोना विषाणूपासून निर्भय झाले. इंग्लंडमध्ये पोहोचल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट मास्क न लावता लंडनच्या रस्त्यांवर फिरताना दिसले. दोघांनी चाहत्यांसोबत सेल्फीही घेतला, ज्याचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले.
आयपीएल २०२२ चे आयोजन बायो बबलमध्ये करण्यात आले होते. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत बायो-बबल नव्हते. बायो बबलमुळे होणा-या थकव्यामुळे बीसीसीआयने ते काढले होते. कोविड-१९ अहवाल निगेटिव्ह आला तरच रोहित अजूनही ५ वी कसोटी खेळू शकतो.
रोहितची आरटीपीसीआर चाचणीही करायची आहे, ज्याचा अहवाल काही तासांत येईल. त्या अहवालातही तो पॉझिटिव्ह आढळल्यास त्याची पाचव्या कसोटी सामन्यात सहभागी होण्याची शक्यता संपुष्टात येऊ शकते. रोहित न खेळल्यास पाचव्या कसोटी सामन्यात ऋषभ पंत भारतीय संघाचे कर्णधारपद भूषवण्याची शक्यता आहे.