मुंबई : २००२ च्या गुजरात दंगलीवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर शनिवारी गुजरात एटीएसच्या दोन पथकांनी तिस्ता सेटलवाड यांना ताब्यात घेतले. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्यांना नेण्यात आले असून एटीएसचे पथक चौकशीसाठी अहमदाबादला घेऊन जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
तत्पूर्वी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने झाकिया जाफरी यांची याचिका फेटाळून लावताना तिस्ता सेटलवाड यांच्या एनजीओची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानंतर एटीएसने ही कारवाई केल्याचे समजते. त्याचवेळी, शनिवारी सकाळी गृहमंत्री अमित शहा यांनीही तीस्ता सेटलवाड यांच्यासह अनेक राजकारण्यांवर नरेंद्र मोदींची बदनामी केल्याचा आरोप केला.
गुजरात एटीएसने तीस्ता सेटलवाड यांच्याविरोधात मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. ज्यामध्ये त्यांच्यावर आयपीसीच्या कलम ४६८ आणि ४७१ अंतर्गत खोटारडेपणाचा आरोप करण्यात आला आहे. एटीएस अधिका-याच्या म्हणण्यानुसार, त्यांना अद्याप अटक करण्यात आलेली नाही, फक्त ताब्यात घेण्यात आले आहे.