मुंबई : शिवसेनेत झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर एकीकडे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेना वाचवण्यासाठी तहान-भूक विसरून राज्यभर दौरे करत आहेत. अशातच राज्याच्या राजकारणात आणखी एका ठाकरेंची एन्ट्री होण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
‘तेजस ठाकरे यांना राजकीय मैदानात उतरवावे’ अशी मागणी युवासेनेने उद्धव ठाकरेंकडे केली आहे. युवासेनेच्या अनेक पदाधिका-यांनी सोशल मीडियातही आपली ही इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे आजवर जंगलात, द-याखो-यांमध्ये रमणारे तेजस ठाकरे राजकारणाच्या आखाड्यात शड्डू ठोकणार का हे पाहावे लागणार आहे.
ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा अपूर्ण आहे. गेल्या ५ दशकांपासून या कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेऊन त्याला आकार दिला आहे. पिढ्यान्पिढ्या हे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे.
आता यात आणखी एका नावाची चर्चा होत आहे.
ठाकरे आणि पवार या दोन घरांभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच दशकांपासून केंद्रित आहे. पिढ्यान्पिढ्या राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत. आता यात एका नवीन नावाची चर्चा होत आहे, ती तेजस ठाकरे यांच्या नावाची. तेजस हे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहेत. ‘सामना’तील त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.
तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र आहेत आणि आतापर्यंत ते राजकारणापासून दूर राहिले आहेत. त्यांची आवड वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधनात आहे. खेकड्यांच्या ११ प्रजाती आणि सापाची एक प्रजाती शोधण्याचे श्रेय तेजसला जाते.
तेजस यांनी सामान्यपणे सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वत:ला दूर ठेवले आहे. भाऊ आदित्य ठाकरे यांच्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी आदित्य यांच्यासोबत पहिल्यांदा तेजस दिसले होते. तेजस सहसा माध्यमांच्या कॅमे-यांपासून स्वत:ला दूर ठेवतात.