25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यातील २५ जिल्ह्यांत तापमान ४१ अंशांवर

राज्यातील २५ जिल्ह्यांत तापमान ४१ अंशांवर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशातील ७० टक्के भागांत उष्णतेची लाट सुरू असून यामुळे ८० टक्के लोकसंख्येच्या जिवाची लाही लाही होत आहे. काल देशातील ३३ शहरांत तापमान ४४ अंशाच्या वर होते. यात ७ शहरांत तापमान ४५ अंशाहून अधिक होते. दरम्यान, महाराष्ट्रात २५ हून अधिक शहरांत पारा ४१ अंशाच्या वर सरकला आहे. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी आणि वर्धा शहरांत तापमान ४५ अंशावर नोंदले गेले. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.

भारतीय हवामान विभागाने विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता. मात्र, विदर्भामध्ये सर्वात जास्त उन्हाची तीव्रता राहणार असल्याचे सांगितले. आगामी आठवडाभर राज्यात उन्हाची तीव्रता अधिक राहणार असून कमाल तापमानाचा पारा चढता राहणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले.

देशात रविवार ठरणार उष्णवार
हवामान विभागाच्या अंदाजानुसार राजस्थान, पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, बिहार, झारखंड या राज्यांत एप्रिलच्या अखेरच्या तीन दिवसांत तापमान वाढते राहील. १ मे रोजी उष्णतेच्या लाटेचा पीक असेल. या राज्यांत अनेक भागांत तापमान ४७-४८ अंशावर जाण्याची शक्यता आहे.

मराठवाडा तापला
मराठवाड्यात तापमान वाढल्याने उष्णतेची लाट पसरली असून, सूर्य एप्रिलअखेरीस अक्षरश: आग ओकत असल्याचा अनुभव येत आहे. औरंगाबाद शहरात काल यंदाच्या उन्हाळ््यातील आणि गेल्या २ वर्षांतील उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची चिकलठाणा वेधशाळेत नोंद झाली. वाढत्या तापमानाने औरंगाबादकरांच्या जिवाची काहिली होत आहे. लातूरमध्येही आज तापमान ४१ अंशांवर नोंदले गेले. तसेच मराठवाड्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांत तापमान वाढले असून, परभणी जिल्ह्यात ४३ अंशांवर, तर लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानी परिसरात तापमान अजूनही ४४ अंशांवर आहे.

विदर्भात ५ दिवस उष्णतेची लाट
मार्च महिन्यापासून सामान्यपणे उन्हाळ््याला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून राज्यात अंगाची काहिली करणारा उकाडा जाणवत आहे. त्यात हवामान खात्याने येत्या ५ दिवसांत राज्यात, विशेषत: विदर्भात उष्ण लहरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे एरवीच तापलेल्या विदर्भाला पुढील ५ दिवस उन्हाचा तीव्र चटका सहन करावा लागणार आहे.

 

 

 

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या