21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला : कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 47 वर
जालना : कोरोनाचा कहर राज्यभरात वाढत असून मराठवाड्यातील उद्योगनगरी जालन्यात कोरोनाने थैमान घातले आहे. एका दिवसात तब्बल ९० रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली असून आरोग्य यंत्रणेला मोठा धक्का बसला आहे. जालन्यातील नागरिकांसाठी आजचा रविवार धडकी भरणार ठरला असून जालन्यात कोरोनामुळे दोन जणांचा बळी गेला. तब्बल 90 नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यातील टेन्शन वाढले आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 47 वर जावून पोहोचली आहे. तर जालना जिल्हा सामान्य रुग्णालयातून आज 21 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
जालना शहरातील बरवारगल्ली परिसरातील असलेला 45 वर्षीय महिला रुग्णाला न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना 8 जुलै रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच रविवारी त्यांचा मृत्यू झाला. शहरातील वाल्मिकनगर परिसरातील रहिवाशी असलेला 59 वर्षीय महिला रुग्णाला अस्थमा व न्युमोनियाचा त्रास होत असल्यामुळे त्यांना 10 जुलै रोजी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना रविवारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.