जिंतूर : तालूक्यातील वस्सा येथे मयत झालेल्या इसमाचा अंत्यविधी पांरपारिक स्मशानभूमीत करण्यास मज्जाव केल्याने तणाव निर्माण झाल्याची घटना दि. १३ मे रोजी शुक्रवारी सकाळी घडली. वस्सा येथील हरिभाऊ रंगनाथ उन्हाळे यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी पहाटे दोन वा.च्या सुमारास निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलबाळ नसल्याने त्यांचे पूतणे रामा उन्हाळे यांनी अंत्यविधीची पूर्ण सज्जता केली.
येथील खंडोबा मंदीर लगतच्या पारंपरिक स्मशानभूमीत प्रेत अंत्ययात्रेसाठी नेले असता संबंधित शेतमालक शंकर सुंदरराव मुटकुळे यांनी सातबारा व नमुना नं. ८ ला स्मशानभूमीची नोंद नसल्याने आपल्या शेतात अंत्यविधी करू देणार नाही अशी भूमिका घेतली व उन्हाळे परिवाराने ही आमची पारंपरिक स्मशानभूमी असल्याने अंत्यविधी येथेच करणार अशी भूमिका घेतली. दोन्ही बाजूंनी टोकाची भूमिका घेतल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला.
याची माहिती बोरी पोलिस स्टेशनला मिळताच स.पो.नि.वसंत मुळे हे दंगा नियंत्रक पथकासह कुमक घेऊन दाखल झाले. नायब तहसीलदार ओमप्रकाश गौड यानांही पाचारण करण्यात आले. शेवटी पोलिस व महसूल प्रशासनाने तणाव वाढणार नाही. याची दक्षता घेत दोन्ही बाजूची समजूत काढल्यानंतर पारंपरिक स्मशानभूमी सोडून रस्त्यालगतच्या रिकाम्या जागेत १० तासानंतर सायंकाळी पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. स.पो.नि.वसंत मुळे,पी.एस.आय.अरुण खिल्लारे, पोलिस उपनिरीक्षक संजय काळे, सिद्धनाथ कोकाटे व शरद सावंत यांनी यावेळी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.