26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeमहाराष्ट्रराज्यात तणाव

राज्यात तणाव

एकमत ऑनलाईन

मुंबई : मशिदीवरील भोंगे न काढल्यास मशिदीसमोर बुधवारपासून हनुमान चालिसा पठण करण्याच्या राज ठाकरे यांच्या इशा-यामुळे राज्यातील वातावरण तापले आहे. त्यामुळे तणाव वाढला आहे. या आंदोलनामुळे राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात आला असून, कायदा व सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्यास कडक कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिला. राज्यात एकूण १५ हजार जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्याची माहितीही दिली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यात तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज वरिष्ठ पोलिस अधिका-यांची बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही, याची पूर्ण खबरदारी घ्यावी, तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करणा-यांविरुद्ध कठोर कारवाई करा, त्यासाठी कोणाच्या आदेशाची वाट बघू नका अशा स्पष्ट सूचना पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील भाषणातील प्रक्षोभक वक्तव्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी खबरदारीच्या उपाययोजनांची माहिती दिली. सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले. एकूण १५ हजार जणांविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे, तर ८७ एसआरपीएफच्या तुकड्या तसेच ३० हजार होमगार्ड संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलिस महासंचालकांनी दिली.

१३ हजार जणांना नोटिसा
बुधवारी राज्यात आंदोलन करण्याची शक्यता असलेल्या मनसे पदाधिकारी व मनसैनिकांना पोलिसांनी नोटीस दिली. १३ हजार जणांना १४९ ची नोटीस देण्यात आली आल्याची माहिती पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांनी दिली.

प्रमुख नेते पोलिसांच्या रडारवर
औरंगाबाद येथील राज यांच्या सभेचे पडसाद उमटू लागले आहेत. राज्यातील पोलिस अलर्ट मोडवर आहेत. राज यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच मनसेचे प्रमुख नेते भूमिगत होऊ लागले आहेत. बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई, संतोष धुरी हे नेते पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगण्यात येत आहे.

भानुशाली यांना अटक
राज्यात प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात येत आहे. मुंबईत मनसेचे चांदिवली विभागाध्यक्ष महेंद्र भानुशाली यांना अटक करून पोलिसांनी कारवाईचे पहिले पाऊल उचलले. भानुशाली यांनी घाटकोपर येथे मशिदीसमोर हनुमान चालिसा लावली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यांना आज बर्वेनगर स्मशानभूमी येथून पोलिसांनी अटक केली.

सुव्यवस्था राखण्यासाठी
आवश्यक ती कारवाई करा
मुंबई : मशिदींवरील भोंग्यांविरोधात उद्या राज्यभर आंदोलन करण्याबाबत मनसेने ठाम भूमिका घेतल्याने कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालकांना दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांच्याशी फोनवरून चर्चा केली. राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी तेथील परिस्थितीनुसार निर्णय घ्या, कोणाच्याही आदेशाची वाट पाहू नका, असे आदेश दिले.

राज ठाकरे भूमिकेवर ठाम
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मशिदीवरील भोंगे हटविण्यासंदर्भात ठाम आहेत. जिथे मशिदीवर भोंगे वाजविले जातील, तिथे हनुमान चालिसा वाजवा, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले आहेत. बांग सुरू झाल्यास पोलिसांच्या १०० क्रमांकावर फोन करून तक्रार करा. राज्यकर्त्यांना हिंदूंची ताकद काय आहे हे दाखवून द्या, असे राज ठाकरे यांनी आपल्या ३ पानांच्या पत्रात म्हटले आहे. आता नाही तर कधीच नाही, असे म्हणत मुख्यमंत्री आपण बाळासाहेबांचे ऐकणार की शरद पवारांचे, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या