मुंबई : शिवसेना नेत्या दीपाली सय्यद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेल्या आहेत. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी एकत्र यायला हवे, अशी अपेक्षा यावेळी दीपाली सय्यद यांनी व्यक्त केली आहे. दोन्ही गट एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
भेटीसाठी निघताना माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, शिवसेनेचे दोन गट एकत्र करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठीच मी शिंदेंना भेटायला चालले आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. शिंदेही बाळासाहेबांना अभिवादन करायला जाणार आहेत आणि ठाकरेही. दोघांचे गुरू एकच आहेत. मग या चांगल्या दिवशी काहीतरी चांगली सुरुवात व्हायला हवी अशी माझी इच्छा आहे.
राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारांना दोन्ही गटांनी पाठिंबा दिला आहे. हे एकत्र येण्याचे संकेत म्हणता येतील का याबाबत बोलताना त्या म्हणाल्या, द्रौपदी मुर्मू यांना उद्धव साहेबांनी पाठिंबा दिला आहे. महिला राष्ट्रपती आहेत, चांगल्या गोष्टींना, चांगल्या व्यक्तींना उद्धव साहेबांनी पाठिंबा दिला आहे. ही गोष्टही सारखीच आहे. दोन्ही गटांना एक व्हायला ही गोष्ट आली आहे. ही चांगली गोष्ट आहे.
बाळासाहेबांना गुरुदक्षिणा म्हणून शिंदे आणि ठाकरेंनी एकत्र यावे, अशी अपेक्षाही त्यांनी बोलून दाखवली. माझ्यासोबत सर्व शिवसैनिकांची ही अपेक्षा आहे, असेही दीपाली सय्यद म्हणाल्या आहेत.