सोशल मीडियावर जोरदार चर्चा; मुख्यमंत्र्यांकडून खंडन
मुंबई : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील बंड हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरातील शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांशी ऑनलाईन संवाद साधला यावेळी त्यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला चांगलेच फैलावर घेतले.
तसेच, सोशल मीडियावर हे सर्व उद्धव ठाकरेंचे कारस्थान असल्याची जी चर्चा सुरू झाली होती, ती देखील उद्धव ठाकरेंनी खोडून काढली. ‘माझं मुख्यमंत्रिपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा आहे. झाडावरची फुलं न्या, फांद्या न्या, मूळ मात्र नेऊ शकत नाही. जे सोडून गेले त्यांचं मला वाईट का वाटावं. आमदारांना फूस लावून मी सत्तानाट्य का घडवेन,’ असे म्हणत उद्धव ठाकरेंनी या चर्चांवर पाणी फेरले.
विधानपरिषद निवडणुकीच्या रात्रीच एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले, ते काही आमदारांना घेऊन सूरतला गेले. त्यानंतर दुस-या दिवशी जेव्हा हे सर्व प्रसारमाध्यमांवर आले, त्यानंतर शिवसेनेच्या गटात खळबळ माजली. यावेळी उद्धव ठाकरेंना ज्या आमदारांनी पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले. ‘उद्धव ठाकरे आप आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या. तेच आमदार दुस-या दिवशी शिंदे गटात सामील झाल्याच्या बातम्या थडकल्या.
शिवसेनेचा कानाडोळा
शिवसेनेने शिंदे गटाची नाराजी दूर करण्याचे अनेक प्रयत्न केले, काही प्रस्तावही दिले, मात्र शिंदे गटाने ते मान्य केले नाहीत. उलट तुम्हीच महाविकास आघाडीतून बाहेर पडा आणि भाजपसोबत सत्ता स्थापन करण्याची ऑफर एकनाथ शिंदेंनी दिली. हे सर्व घडत असताना शिवसेना आपल्या आमदार, खासदारांवर नरज ठेवून होती. त्यांच्यासोबत वारंवार बैठका घेतल्या जात होत्या. सूरतला एक दिवस राहिल्यानंतर शिंदे गटाने थेट गुवाहाटी गाठले. त्यानंतरही शिवसेनेच्या एका पाठोपाठ एक आमदाराचे आऊटगोईंग सुरुच होते. आता शिंदे गटात शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आहेत. गेल्या ४ दिवसांपासून बंडाळीचे महानाट्य सुरु आहे.
मुख्यमंत्रीच बंडाचे सूत्रधार?
पहिल्यादिवशी एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन गेले हे कोणालाच माहिती नव्हते. मात्र, त्यानंतर सर्व माहिती असतानाही असे कसे शिवसेनेचे आमदार फुटले आणि थेट गुवाहाटीला पोहोचले? एका पाठोपाठ एक आमदार गुंगारा देऊन शिंदे गटात सामील होणे. हे इतक्या मोठ्या प्रमाणात कसे शक्य आहे, यावर संशय व्यक्त होऊ लागला. सोशल मीडियाच्या माध्यमातून तर थेट हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचेच कारस्थान असल्याचे बोलले गेले. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडण्यासाठी मुख्यमंत्र्यांनीच हे सर्व घडवून आणले, अशा चर्चांना सोशल मीडियावर उधाण आले.
संजय राऊतांचे खतपाणी
या बंडखोरांमध्ये उद्धव ठाकरेंच्या जवळचे अनेक लोक असल्याने शिवसेनेला याबाबत संशय कसा आला नाही, यावर विश्वास बसणे कठीण होते. शिवसेनेतून बंडखोरी करणा-यांविरोधात शिवसेना भवनासमोर आंदोलन करणारे, घोषणाबाजी करणारे आमदार सदा सरवणकर हे देखील शिंदे गटात सामील झाले. मंत्री गुलाबराव पाटील यांनीही गुवाहाटीची फ्लाईट पकडली. कृषिमंत्री दादा भुसे यांनीही बंडखोरी केली. याबाबत मुख्यमंत्री, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि प्रशासनाला कळले कसे नाही असाही प्रश्न उपस्थित झाला. दुसरीकडे, माध्यमांमध्ये अनेक बातम्या येऊ लागल्या.
जेव्हा एकनाथ शिंदे हे सूरतला गेले तेव्हा गुजरातच्या सीमेपर्यंत त्यांना पोलिसांनी सुरक्षा दिली. तसेच, एकनाथ शिंदे हे आमदारांना घेऊन जात असल्याची पूर्ण कल्पना पोलिसांना होती, अशा पोस्ट सोशल मीडियावर फिरु लागल्या. खासदार संजय राऊतांनीही पत्रकार परिषदेत शिंदे गटाने मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंपुढे त्यांची मागणी मांडावी, जर त्यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडायचे असेल तर त्यावर नक्कीच विचार होईल, असे म्हटले. त्यामुळे या चर्चांना आणखी खतपाणी मिळाले.
मात्र, सोशल मिडीयावरील या सर्व चर्चा आज मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भाषणातून खोडून काढल्या आहेत. आता महाराष्ट्राचे राजकारण आणखी कुठले वळण घेते हेच आता पहायचे.