नाशिक : नाशिकमध्ये शिवसेनेला गेल्या काही दिवसांमध्ये मोठे खिंडार पडल्याचे दिसून आले आहे. नाशिकमध्ये शिवसेनेला पुन्हा भरारी देण्यासाठी संजय राऊत यांनी दोन वेळा दौरा केला. पदाधिका-यांशी संवाद साधला. सेनेला भरारी देण्यासाठी त्यांनी महत्त्वाचे प्रयत्न केले. अशातच शिवसेनेच्या ठाकरे गटाने भाजपचे नेते डॉ. अद्वय हिरे यांना आपल्या गटाकडे वळविण्यात यश मिळवले आहे.
नाशिकमधील माजी मंत्री प्रशांतदादा हिरे यांचे पुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे नेते डॉ. अद्वय हिरे हे भाजपला सोडचिठ्ठी देऊन ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाला धक्के बसल्यानंतर आता ठाकरे गटाने भाजपला मालेगावमध्ये मोठा धक्का दिला आहे. याचबरोबर हिरे यांच्या ठाकरे गटात प्रवेशानंतर शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांच्यासमोर देखील आव्हान निर्माण होणार आहे.
भाजप नेते डॉ.अद्वय हिरे आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करणार असल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. डॉ.अद्वय हिरे यांनी रविवारी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून याबाबत कार्यकर्त्यांची भूमिका जाणून घेतली. बैठकीत उपस्थित कार्यकर्त्यांनी एकमताने शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश करण्यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन लवकरच पक्षप्रवेश करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हिरे यांच्या पक्षप्रवेशामुळे नाशिकमध्ये शिवसेनेच्या ठाकरे गटाला उभारी मिळणार आहे. तिथे पक्षबांधणीसाठी मदत होईल. शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांना शह देण्यासाठी ठाकरे गटाची रणनीती असल्याचे देखील म्हटले जात आहे. त्यामुळे आगामी काळात होणा-या निवडणुकीमध्ये मालेगावात दादा भुसे विरुद्ध अद्वय हिरे असा सामना दिसून येईल.