जहांगीरपुरीत २ दहशतवादी अटकेत, कट उघड
नवी दिल्ली : २६ जानेवारी पूर्वी दिल्ली पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उधळून लावला आहे. दिल्ली पोलिसांनी जहांगीरपुरी येथून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. हे दोघे आयएसआयसाठी काम करत असल्याचे चौकशीत समोर आले. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने प्रजासत्ताक दिनापूर्वी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट उघडकीस आणला असून, दोघांच्या चौकशीतून हरकत उल अन्सार आणि खलिस्तान टायगर फोर्स यांचे संबंध असल्याचा खुलासा केला. त्यांचा उद्देश भारतात दहशत पसरवणे आहे. त्यामुळे मोठा कट उधळला गेला.
जहांगीरपुरी येथून अटक करण्यात आलेल्या संशयितांकडून हातबॉम्ब जप्त करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी भालस्व डेअरीवर छापेमारी केली आणि दोन संशयित दहशतवाद्यांना अटक केली. दोघांनी दिलेल्या माहितीवरून भालसवा नाल्यातून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. नाल्यामध्ये एका मृतदेहाचे तीन अवशेष आढळून आले आहेत. या दोन्ही संशयितांनीच ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
दिल्ली पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी जगजीत उर्फ जग्गा आणि नौशाद नावाच्या दोन संशयितांना अटक केली होती. नौशाद पाकिस्तानातील हरकत-उल-अन्सार या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. त्याचा हस्तक पाकिस्तानात असल्याची माहिती आहे. जगजीतचा परदेशात असलेला खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्लाशी संबंध आहे. अर्शदीप डल्ला खलिस्तान टायगर फोर्सचा दहशतवादी आणि पंजाबचा गुंड आहे. या दोघांची चौकशी केली असता २६ जानेवारी रोजी दहशतवादी हल्ल्याचा मोठा कट होता, असे उघड झाले आहे. त्यामुळे दिल्ली पोलिस अतिरेक्यांचा कट उधळण्यात यशस्वी झाले आहेत.