औरंगाबाद : गेल्या ६ महिन्यांपासून शिवसेना कुणाची? या प्रश्नामुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आरोप-प्रत्यारोप होत असतात मात्र यावेळी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी थेट शिंदे गटासह निवडणूक आयोग आणि केंद्रीय यंत्रणा यांच्यावर आरोप केले आहेत.
शिवसेना कोणाची यासंबंधी सुनावणी सुरू असतानाच निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. निवडणूक आयोगासह केंद्रीय यंत्रणा शिंदे गटाला गोपनीय माहिती पुरवत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सत्तासंघर्षावर सुनावणीसंबंधी प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे म्हणाले की, आमचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. तर काही लोक बातम्या पुरवत आहेत. निवडणूक आयोगात जर आम्ही एखादा अर्ज दिला तर त्याच्या पाच मिनिटांपूर्वीच त्यांचा देखील अर्ज येतो. त्यामुळे कुठेतरी लिकेज होत आहे.
केंद्र शासनाच्या काही यंत्रणा अशा आहेत की, आम्ही कोणता कागद दिला आणि त्यापेक्षा शिंदे गटाने कोणता कागद द्यावा याबाबत माहिती पुरवतात, असा दावा खैरे यांनी केला आहे. त्यामुळे खैरे यांच्या दाव्यामुळे थेट निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर खैरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे बोलले जात आहे.