लॉकडाऊन काळात रोजगाराअभावी गोडबोले कुटुंबावर आले होते संकट
नागपूर : कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या लॉकडाऊनचा सामना क्रीडा विश्वालाही करावा लागला आहे. . नागपूरची उदयोन्मुख धावपटू प्राजक्ता गोडबोले हिला लॉकडाऊन काळात कोरोना आणि भूक अशा दुहेरी संकटाचा सामना करावा लागत होता. नागपूरच्या सिरसापेठ भागात राहणा-या प्राजक्ताची आई लग्नाचं कंत्राट घेणा-या कॉन्ट्रॅक्टरकडे जेवण बनवायचे काम करते, मात्र सध्याच्या काळात रोजगार तुटल्यामुळे गोडबोले परिवाराकडे दोन वेळच्या जेवणासाठीचेही पैसे नव्हते.
Read More प्रेक्षकांविना सामने खेळण्यास तयार : नवदीप
प्राजक्ताच्या परिवारावर ओढवलेल्या परिस्थितीची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना समजली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागपूरमधील शिवसेना पदाधिकाºयांना संपर्क साधत प्राजक्ताच्या परिवाराला मदत करण्याचे आदेश दिले आहेत. ‘‘काही दिवसांपूर्वीच आम्ही गोडबोले परिवाराशी संपर्क साधला. त्यांना काही दिवस पुरेल असं अन्नधान्य आणि १६ हजार रुपयांची मदत आम्ही केली आहे. यापुढेही मदत लागल्यास आम्ही त्यांच्या संपर्कात राहणार आहोत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्राजक्ताच्या परिवाराबद्दल माहिती कळल्यानंतर त्यांनी आम्हाला मदत करण्याचे आदेश दिले.’’ शिवसेनेचे नागपूर शहर प्रमुख प्रकाश जाधव यांनी माहिती दिली.
प्राजक्ताने आतापर्यंत २०१९ साली इटलीत झालेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेममध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ५ हजार मी. धावण्याच्या शर्यतीत प्राजक्ताने १८:२३:९२ अशी वेळ नोंदवली. मात्र अंतिम फेरीत दाखल होण्यात तिला अपयश आले. काही दिवसांपूर्वी झालेल्या भुवनेश्वर हाफ मॅरेथॉनमध्येही प्राजक्ताने दुसरा क्रमांक पटकावला होतालॉकडाऊन काळात सर्व व्यवहार ठप्प झाल्यामुळे गोडबोले कुटुंबासमोर मोठं संकट निर्माण झालं होतं. मात्र शिवसेनेच्या मदतीनंतर गोडबोले परिवारावरचं संकट दूर झालेलं आहे.