लातूर : प्रतिनिधी
उदगीर शहरात एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात एका ७० वर्षीय महिलेला कोरोनाचा संसर्ग झाला व त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर उदगीर शहरातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत जाऊन शहरातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या २९ झाली व त्यामुळे उदगीरची परिस्थिती गंभीर बनेल, असे चित्र दिसत असताना शासन-प्रशासन यांनी अत्यंत प्रभावीपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजना राबविल्या त्यामुळे उदगीर येथील २१ रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून दि़ १९ मेपर्यंत संपूर्ण उदगीर शहर कोरोनामुक्त होईल, असे पर्यावरण, भूकंप पुनर्वसन, पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी योजना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.
Read More उदगीरमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याची दक्षता घ्या
आरोग्य विभाग, पोलिस विभाग व महसूल विभागाने परस्परात योग्य समन्वय ठेवून उदगीर शहरात अत्यंत परिणामकारकपणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या त्यामुळे कोरोना चा संसर्ग शहराच्या इतर भागात झालेला नाही तसेच प्रतिबंधित क्षेत्रातील सुमारे साडेसतरा हजार नागरिकांचे आरोग्य तपासणी करण्यात येऊन सुमारे ४०० पेक्षा अधिक लोकांची स्वॅब तपासणी करण्यात आली त्यामुळे कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्यावर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करण्यात आरोग्य विभागाने चांगली भूमिका बजावली, असे राज्यमंत्री बनसोडे यांनी सांगितले. या पूर्वी १५ रुग्ण कोरोनामुक्त झालेले असून आजचे ६ रुग्ण व उर्वरित ७ रुग्णही लवकरच बरे होऊन घरी जातील, अशी माहिती राज्यमंत्री बनसोडे यांनी देऊन यानंतर उदगीर शहरातील प्रत्येक नागरिकांची थर्मल स्कॅनिंग करण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करून आत्यवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले.
Read More उदगीरात आणखी एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह
आज सायंकाळी उदगीर सामान्य रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या ६ रुग्णांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले. या वेळी रुग्णालय प्रशासन, महसूल प्रशासन व पोलिस विभाग तसेच राज्यमंत्री बनसोडे यांनी बरे झालेल्या रुग्णांचे स्वागत केले व त्यांना शुभेच्छा दिल्या. या वेळी अप्पर जिल्हाधिकारी अविनाश पाठक, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश हरिदास, रुग्णालयाचे नोडल अधिकारी शशिकांत देशपांडे व तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यासह प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात पालकमंत्री अमित विलासराव देशमुख, राज्यमंत्री संजय बनसोडे व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल, पोलिस, आरोग्य व इतर सर्व संबंधित विभाग परस्परात योग्य समन्वय ठेवून काम करीत आहेत त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना यशस्वीपणे राबविण्यात प्रशासनाला यश येत आहे तसेच उदगीर शहरासह जिल्ह्यातील नागरिक प्रशासनाला उत्तमप्रकारे सहकार्य करीत आहेत.