आणखी १० बाधितांचा मृत्यू, ३०३ नव्या रुग्णांची भर
लातूर : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ होत असून, शुक्रवारी आणखी ३०३ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यासोबतच मृतांचा आकडाही वेगाने वाढत असून, सलग चार दिवसांपासून रोज १० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात बाधित रुग्णांच्या मृतांचा आकडा ४०२ वर गेला आहे. त्यामुळे लातूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या तुलनेत बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याने रिकव्हरी रेट रोज सुधारत असून, आज तो ७५.४९ टक्क्यांवर पोहोचला.
लातूर जिल्ह्यात काल ४४८ आरटीपीसीआर, तर ७२४ रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या होत्या. या चाचण्यांचा रिपोर्ट शुक्रवारी प्राप्त झाला असून, आरटीपीसीआर टेस्टमधील १२६ आणि रॅपिड अँटिजन टेस्टमधील १७७ असे एकूण ३०३ रुग्ण आज पॉझिटिव्ह आढळून आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या १३ हजार ७७४ वर पोहोचली असून, यापैकी ४०४ जणांचा मृत्यू झाला, तर १० हजार ३९८ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे सध्या २ हजार ९७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातही २ हजार ३४३ रुग्णांची लक्षणे सौम्य आहेत.
दरम्यान, जिल्ह्यात आणखी १० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक विभागाच्या अहवालात जाहीर करण्यात आले. यामध्ये लातूर येथील श्रीनगर, तालुक्यातील देवळा सारसा, मुरुड येथील रुग्ण, चाकूर तालुक्यातील नायगाव, रोहिणा, रेणापूर तालुक्यातील कुंभारवाडी, उदगीर शहर आणि तालुक्यातील हाळी, अहमदपूर तालुक्यातील रुग्णाचा समावेश आहे. सलग चार दिवसांपासून रोज १० बाधितांचा बळी जात असल्याने चिंता वाढली आहे.
३२१ जणांची कोरोनावर मात
लातूर जिल्ह्यात रोज ३०० पेक्षा अधिक रुग्णांची भर पडत आहे. दिलासादायक बाब म्हणजे अलिकडे रोजच बरे होणा-या रुग्णांची संख्या नव्या बाधित रुग्णांपेक्षा अधिक आहे. शुक्रवारीही ३२१ रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे एकीकडे चिंता वाटत असली, तरी दुसरीकडे दिलासाही मिळत असल्याचे चित्र आहे.