27.7 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रराज्याला बदनाम करण्याचा कुटिल डाव हाणून पाडणार

राज्याला बदनाम करण्याचा कुटिल डाव हाणून पाडणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : कितीही अडथळे आणि संकटे येऊ देत महाराष्ट्राची घोडदौड सुरूच राहील. अवघ्या देशाला स्फूर्ती देणारा हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे. ज्यांनी संयुक्त महाराष्ट्रासाठी आपले रक्त सांडले, त्यांचे बलिदान कधीही विसरणार नाही आणि हे करताना महाराष्ट्र धर्माची पताका देशातच नव्हे तर विश्वात फडकविल्याशिवाय राहणार नाही, असा ठाम विश्वास व्यक्त करीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येस राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. आज महाराष्ट्राच्या अस्मितेवर घाव घालण्याचे आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे कुटील कारस्थान जर कुणी करीत असेल तर येथील स्वाभिमानी जनता त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात दिला.

आमचे महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतरचा हा तिसरा महाराष्ट्र दिन आहे. दोन वर्षे तर देशावर कोरोना विषाणूचे संकट होते. पण याही आव्हानात्मक परिस्थितीत शेती, उद्योग, गुंतवणूक यामध्ये महाराष्ट्राने स्वत:ला आघाडीवर ठेवले. शिवभोजनसारखी थाळी मोफत देऊन, तसेच दुर्बल, असंघटित वर्गाला आर्थिक सहाय्य करून सामाजिक भान ठेवले आणि महाराष्ट्राची परंपरा कायम ठेवली.

आरोग्य असेल किंवा सुशासन, पर्यावरण असेल किंवा नागरी विकास, महाराष्ट्राने उचललेल्या ठोस पावलांचे देश तसेच जागतिक पातळीवरही कौतुक झाले. संकटातच खरी परीक्षा होते असे म्हणतात, त्याप्रमाणे गेल्या अडीच वर्षात नैसर्गिक आपत्ती किंवा विषाणूच्या आक्रमणात प्रशासनाने अगदी तळागाळापासून अतिशय धीराने आणि हिमतीने काम केले. त्यामुळे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडा उचलून सर्वांचे मनोधैर्य खच्ची करण्याचे प्रयत्न फिके पडल्याचे दिसते, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.

राज्याचा लढवय्यांचा इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास लढवय्यांचा आहे. मग मोगलांच्या आक्रमणाला थोपविणारे छत्रपती शिवराय, औरंगजेबाला ललकारणा-या ताराराणी असोत किंवा सामाजिक सुधारणांसाठी आयुष्य पणाला लावणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा जोतिबा आणि सावित्रीबाई फुले असोत. या सर्वांनी आणि त्यांना आदर्शवत मानणा-या अनेकांनी जात पात धर्म याचा विचार न करता महाराष्ट्राची सामाजिक वीण मजबूत केली.

डॉ. आंबेडकरांची अनमोल देणगी
या भूमीचे सुपुत्र असलेल्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना म्हणणे केवळ एक पुस्तक नाही तर देशातील प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार देणारी एक अनमोल देणगी आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याचा प्रयत्न
दुर्दैवाने आज स्वार्थ आणि महत्त्वाकांक्षेपोटी महाराष्ट्रामधील जात धर्मांतील सलोखा संपवून सामाजिक क्रांतीच्या या तमाम महापुरुषांचे विचार मातीस मिळविण्याची काम काहीजण करीत आहेत. मात्र, महाराष्ट्र हा सामाजिक सलोखा, संयम आणि सारासार विवेकबुद्धीने वागणारा म्हणून ओळखला जातो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या