34 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home राष्ट्रीय कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार

कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत लढणार

एकमत ऑनलाईन

हाथरस : काँग्रेसचे खासदार राहुल गांधी आणि पक्षाच्या महासचिव प्रियांका गांधी वाढेरा अखेर शनिवारी सायंकाळी ७.२५ मिनिटांच्या दरम्यान उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये दाखल झाल्या. कथित सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीच्या घरी जाऊन त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत के. सी. वेणुगोपाल, गुलाम नबी आझाद, पी. एल. पुनिया उपस्थित होते. एका बंद खोलीत राहुल-प्रियांका यांनी पीडित कुटुंबीयांशी बातचीत करताना त्यांचं दु:ख जाणून घेतले. यावेळी प्रियंका यांनी पीडितेच्या आईला घट्ट मिठी मारत न्याय मिळवून देण्याचा निर्धार व्यक्त केला.

या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, तसेच कुटुंबाला धमकी देणा-या जिल्हाधिका-यांना निलंबित करण्यात यावे, अशी पीडित कुटुंबीयांची इच्छा आहे. पीडित कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार, असे प्रियंका गांधी वढेरा म्हणाल्या. कुटुंबाला त्यांच्या मुलीला अखेरचे पाहताही आले नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव असायला हवी, असेही त्या म्हणाल्या.

तत्पूर्वी शनिवारी दिल्लीहून हाथरसकडे निघालेल्या राहुल-प्रियका गांधी यांना दिल्ली-नोएडा डायरेक्ट फ्लायओव्हर (डीएनडी) वर अडवण्यात आले. काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात बाचाबाची आणि लाठीचार्जचा प्रकार घडल्यानंतर प्रियांका-राहुल गांधी यांच्यासह केवळ पाच जणांना हाथरसकडे जाण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे काँग्रेसच्या अन्य नेत्यांसोबत मल्लिकार्जुन खडगे आणि रणदीप सुरजेवाला यांना माघारी फिरावे लागले. प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यासोबत काँग्रेस नेते पी. एल. पुनिया, गुलाम नबी आझाद, प्रमोद तिवारी हेदेखील हाथरसमध्ये पोहोचल. या दरम्यान, हाथरसमध्ये मोठ्या संख्येनं मीडिया कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते. प्राथमिक माहितीनुसार जवळपास २००० हून अधिक लोक येथे जमले होते. सुरक्षेसाठी पोलिस अधिकारीही हाथरसमध्ये तैनात आहेत.

प्रियंका गांधी-वढेरा यांनी चालवली कार
हाथरसला जाताना प्रियंका गांधी स्वत: कार चालवत होत्या. त्यांच्यासोबत राहुल गांधी होते. त्यांच्या गाडीच्या मागे वाहनांचा भला मोठा ताफा होता. राहुल व प्रियंका गांधी हे हथरसकडे रवाना होताच उत्तर प्रदेश पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर फौजफाटा वाढवला होता, तर विविध ठिकाणी काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक होत रस्त्यांवर उतरल्याचे दिसून आले होते. यमुना एक्स्प्रेस वेवर जागोजागी पोलिसांचा ताफा तैनात केला होता.

पाच नेत्यांनाच दिली भेटण्याची परवानगी
उत्तर प्रदेशमधील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणी विरोधकांनी उत्तर प्रदेश सरकारला धारेवर धरले असून, याच पार्श्वभूमीवर आज पुन्हा एकदा काँग्रेस नेते राहुल गांधी पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी दिल्लीवरून हाथरसकडे रवाना झाले. डीएनडी महामार्गावर त्यांचा ताफा पुन्हा अडवला. मात्र, कॉंग्रेस नेते, कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे अखेर प्रशासनाने राहुल गांधी, प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह गुलाम नबी आझाद, के. सी. वेणुगोपाल, पी. एल. पुनिया यांना हाथरसमध्ये जाण्यास परवानगी दिली.

चौकशीबाबत समाधानी नाही
आम्ही सध्या सुरू असलेल्या चौकशीने संतुष्ट नाही. कारण आम्हाला अद्याप प्रश्नांची उत्तरे मिळालेली नाहीत. ज्या जिल्हा दंडाधिका-यांनी कुटुंबाला खुलेआम धमकी दिली, त्यांनाही अद्याप निलंबित करण्यात आलेले नाही, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या भावानं मीडियासमोर व्यक्त केली.

हाथरसला आले छावणीचे स्वरूप
उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेवर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. त्यातच पोलिसांकडून विरोधी पक्षातील नेते आणि माध्यमांची होणारी अडवणूक यामुळे उद्रेक वाढला आहे. या पार्श्वभूमीवर हाथरसमध्ये बंदोबस्त वाढवला आहे. त्यामुळे या भागाला छावणीचे स्वरुप आले आहे.

रुग्णसंख्या ६४ लाखांवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या