कोईम्बतूर : भारत गौरव योजनेंतर्गत देशातील पहिली खासगी रेल्वे सेवेला मंगळवारी कोईम्बतूर येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. ही ट्रेन कोईम्बतूरहून मंगळवारी निघाली असून गुरुवारी शिर्डीतील साई नगरला पोहोचेल.
या स्पेशल ट्रेनमध्ये १५०० लोक प्रवास करू शकतात.
दक्षिण रेल्वेचे सीपीआरओ बी गुग्नेसन यांनी ही माहिती दिली. रेल्वेने ही ट्रेन एका सर्व्हिस प्रोव्हायडरला २ वर्षांसाठी लीजवर दिली आहे.
यात एकूण २० डबे आहेत. शिर्डीला पोहोचण्यापूर्वी ट्रेनला तिरुपूर, इरोड, सेलम जोलारपेट, बेंगळुरू येलाहंका, धर्मावरम, मंत्रालयम रोड आणि वाडी येथे थांबे असतील. या ट्रेनमधील स्लीपरला नॉन एसीसाठी २,५०० रुपये, थर्ड एसीसाठी ५,००० रुपये, सेकंड एसीसाठी ७,००० रुपये आणि फर्स्ट एसीसाठी १०,००० रुपये प्रवास भाडे मोजावे लागतील.