24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeराष्ट्रीयजी-७ परिषद सप्टेंबरमध्ये होणार, भारताला आमंत्रण मिळणार

जी-७ परिषद सप्टेंबरमध्ये होणार, भारताला आमंत्रण मिळणार

एकमत ऑनलाईन

चीनच्या कोंडीसाठी चर्चा होण्याची शक्यता

वॉशिंग्टन: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-७ सदस्यांच्या परिषदेचे आयोजन सप्टेंबरमध्ये करण्याचे संकेत दिले आहेत. या परिषदेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांना आमंत्रण दिले जाईल, असेही संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. जगाचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी जी-७ च्या आयोजनात हा मोठा बदल केला जाणार आहे.

जी-७ या सात सदस्यांच्या गटात अमेरिका, कॅनडा, इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली आणि जपान हे सात देश आहेत. विकसित देशांच्या या परिषदेत अनेकदा त्यांच्या राजकीय आणि आर्थिक हितांचा प्राधान्याने विचार करुन निर्णय घेतले जातात. जगाच्या भल्यासाठी असा दावा करुन हे निर्णय राबवले जातात. त्यामुळे जी-७ या परिषदेकडे जगातील बड्या देशांची परिषद अशाच पद्धतीने अनेकजण बघतात. पण या परिषदेला भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया आणि दक्षिण कोरिया या देशांना आमंत्रण देण्यात आले तर अनेकांचे लक्ष परिषदेकडे असेल.

काही दिवसांपूर्वी जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी अध्यक्षपदी भारताची निवड झाली आहे. या पाठोपाठ जी-७ मध्ये भारताला प्रतिनिधित्वाची संधी मिळाल्यास जगासाठी जी-७ ही महत्त्वाची परिषद ठरले. चीनला रोखण्यासाठी अमेरिका जी-७च्या निमित्ताने आशिया आणि युरोपमधील प्रमुख देशांना एकत्र आणून नव्या डावपेचांची आखणी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये या परिषदेत काय ठरते याकडे जगाचे लक्ष आहे.

Read More  राज्यातील शासकीय कार्यालयं टप्प्याटप्प्यानं सुरू होणार, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नियमावली जाहीर

साधारणपणे सप्टेंबर महिन्यात संयुक्त राष्ट्रांची परिषद न्यूयॉर्क येथे होते. या परिषदेच्या आधी किंवा नंतर जी-७ परिषद होण्याची शक्यता आहे. या परिषदेच्या तारखा लवकरच जाहीर होतील, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत.

याआधी जी-७ परिषद मार्चमध्ये होणार होती. मात्र कोरोना संकटामुळे जी-७ची वार्षिक बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जूनच्या १० ते १२ या कालावधीत घेण्याचा निर्णय झाला. या नंतर ट्रम्प यांनी एकदम जी-७ परिषद सप्टेंबरमध्ये घेण्याचे नवे संकेत दिले आहेत. ट्रम्प यांच्या वक्तव्याचे जागतिक राजकारणाचे अभ्यासक आपापल्या पद्धतीने अर्थ लावत आहेत.

पॅसिफिक महासागराच्या (प्रशांत महासागर) चीनजवळच्या भागाला चीनने दक्षिण चीन समुद्र (साऊथ चायना सी) असे नाव दिले आहे. या पट्ट्यात मागील काही वर्षांपासून चीन दादागिरी करण्याच्या प्रयत्नात आहे. शेजारच्या व्हिएतनाम, थायलंडसह सर्वच देशांना चीन दबावाखाली ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. ही दादागिरी सुरू असतानाच वुहानमधून जगभर पसरलेल्या कोरोनामुळे जगात चीनविषयी नाराजी आहे. कोरोना संकटाविषयी लपवाछपवी करणाऱ्या चीनला धडा शिकवण्यासाठी जगातील बडे देश उत्सुक आहेत. त्यामुळे जी-७ परिषदेत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे. चीनला दक्षिण चीन समुद्रातून हिंद महासागरात प्रवेश करण्यासाठी मलाक्काच्या सामुद्रधुनीतून जावे लागते. नौदलाचा अंदमान-निकोबार येथील तळ तसेच बंगालचा उपसागर आणि हिंद महासागरात उभ्या असलेल्या भारतीय युद्धनौका यांनी चीनची कोंडी केली तर त्यांच्यासाठी हिंद महासागरात प्रवेश अशक्य होऊ शकतो. जी-७ देशांच्या परिषदेत ही कोंडी करण्यासाठी भारताला पाठिंबा जाहीर झाला तर चीनसाठी हा सर्वात मोठा धक्का ठरण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या