वॉशिंग्टन : अमेरिकेतील भारतीय वंशाचे खासदार राजा कृष्णमूर्ती यांनी इलिनॉय राज्यातून डेमोक्रॅटिक पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकली. कृष्णमूर्ती यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी जुनैद अहमद यांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
इलिनॉय राज्यात अत्यंत लोकप्रिय असलेल्या कृष्णमूर्ती यांनी जुनैद अहमद यांचा ७१ टक्क्यांहून अधिक मतांनी पराभव केला. या विजयानंतर कृष्णमूर्ती म्हणाले, या विजयामुळे मला खूप सन्मान मिळाला. इलिनॉय राज्यामधील आठव्या जिल्ह्यातील डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांनी मला पुन्हा यूएस काँग्रेसचा सदस्य होण्यासाठी मोठ्या संख्येने मतदान केले.
इलिनॉय प्रांतातील लोकांना शांतता, प्रगती आणि समृद्धी हवीय. याशिवाय, महागाई आणि गॅसच्या वाढत्या दराविरोधातही मी आवाज उठवणार आहे. येत्या काही महिन्यांत या समस्यांचे निराकरण करण्यासाठी मी अथक प्रयत्न करत राहीन.
दरम्यान, भारतीय वंशाचे राजा कृष्णमूर्ती हे २०१७ पासून इलिनॉयच्या ८ व्या जिल्ह्यासाठी अमेरिकन काँग्रेसचे सदस्य म्हणून काम करत आहेत. कृष्णमूर्ती यांचे आई-वडील तामिळनाडूचे आहेत. राजा कृष्णमूर्ती हे तीन वेळा अमेरिकन काँग्रेसचे सदस्य राहिले. राजा कृष्णमूर्ती यांचा जन्म नवी दिल्लीत झाला. आता ८ नोव्हेंबर रोजी होणा-या अमेरिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत त्यांचा सामना रिपब्लिकन पक्षाच्या ख्रिस डर्गिसशी होणार आहे.