पुणे : ‘‘दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावर देखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेमागील मास्टर माईंड शोधून काढला पाहिजे. त्याला कडक शासन झाले पाहिजे’’, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.
काँग्रेस पक्षाच्या आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सदर प्रतिक्रिया दिली. अजित पवार पुढे म्हणाले की, राजीव सातव यांनी आमदार, खासदार म्हणून चांगले काम केले आणि त्यापूर्वी त्यांच्या आईदेखील आमदार राहिल्या आहेत. राजीव सातव यांच्या कुटुंबीयांना राजकीय वारसा लाभला आहे.
त्याचदरम्यान राजीव सातव यांचे निधन झाल्यावर त्यांच्या पत्नी प्रज्ञा सातव या आमदार म्हणून काम करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यावरदेखील हल्ला झाला होता. त्यानंतर काल प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला आहे. या भ्याड हल्ल्याचा निषेध करत असून, प्रत्येकाचे संरक्षण करणे ही राज्य सरकार आणि पोलिसांची जबाबदारी असते. या घटनेमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी तातडीने लक्ष घालावे, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे.
राहुल कलाटेंना कुणाची फूस?
राहुल कलाटे यांच्या उमेदवारी अर्जाबद्दल माध्यमांच्या प्रतिनिधींनी अजित पवार यांना विचारले असता, अजित पवार म्हणाले की, मी अजून राहुलला विचारलं नाही की तुला फूस कोणाची आहे? तुम्ही मला प्रश्न विचारल्यामुळे आता माझी आणि त्याची जेव्हा भेट होईल तेव्हा मी त्याला विचारेन, का रे बाबा तुला नेमकी कोणाची फूस आहे? यावर पत्रकारांनी अजित पवार यांना विचारले की, राहुल तुमचे ऐकणार का? त्यावर अजित पवार चांगलेच संतापले. ‘‘मी पत्रकारांचा आदर करतो. पण असले आलतूफालतू प्रश्न विचारणार असाल तर पुन्हा मी माध्यमांशी बोलणार नाही.’’