मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राज्यपाल, भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यात संताप व्यक्त होत असताना आता शिंदे गटातील मंत्रीदेखील आक्रमक झाले आहेत. राज्याचे मंत्री गुलाबराब पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. माझे मंत्रिपद गेले तरी चालेल, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणा-यांना सोडणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला.
छत्रपती शिवरायांचा जन्म कोकणात झाला असल्याचे वक्तव्य भाजप नेते प्रसाद लाड यांनी केले होते. त्यांच्या वक्तव्याचा व्हीडीओ व्हायरल होत आहे. मंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील याचा जोरदार शब्दात समाचार घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलण्याचा अधिकार नाही. छत्रपती शिवरायांबद्दल कोणीही चुकीचे बोलत असेल, तर तो कोणत्याही पक्षाचा असला तरी त्याला माफ केले जाणार नाही असे मंत्री गुलाबराव पाटील म्हटले. छत्रपती शिवरायांच्या नखाची बरोबरी हे नालायक करू शकत नाही, मंत्रीपद गेल खड्ड्यात यांना सोडणार नाही असा आक्रमक इशाराही मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिला.
एकनाथ खडसेंवर टीकास्त्र
जळगाव जिल्हा दूध संघाचे निवडणूक आदेश दोनच दिवसात पुन्हा बदलल्याने त्यावरून एकनाथ खडसेंनी ही लोकशाहीची टिंगल सुरू असून सरकारचा निर्लज्जपणा करत असल्याची टीका केली होती. या टीकेला मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. दूध महासंघाच्या सरकारने काढले आहेत मंत्री गुलाबराव पाटील यांनी काढलेले नाहीत. एकनाथ खडसे हे विरोधक असल्याने माझ्यावर टीकाच करतील असेही त्यांनी म्हटले.