अमरावती : उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या खूनानंतर, महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये आठवडाभरापूर्वी झालेल्या हत्येची चर्चा होत आहे.
वैद्यकीय उपकरणांचा व्यापार करणा-या उमेश कोल्हे नावाच्या व्यावसायिकाची गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. उदयपूरमधील कन्हैया लालवर दोन जणांनी ज्याप्रकारे हल्ला केला होता, तसाच खून उमेश कोल्हे यांचा करण्यात आल्याचा संशय भाजपचे खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला. हल्लेखोरांनी कन्हैयाच्या हत्येनंतर सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करत इस्लामच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं.
अमरावतीमधील उमेश कोल्हे यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटकेत असलेल्या पाच आरोपींनी अद्याप हत्येचा उद्देश सांगितलेला नाही, पण आम्हाला एकाने हत्या करण्यास सांगितलं होतं, असं त्यांनी म्हटलं. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत टिप्पणी केलेल्या पोस्ट शेअर केल्याप्रकरणी उमेश कोल्हे त्यांची हत्या केली असावी, असा संशय भाजप खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी वर्तवला आहे.
या हत्येचा काटेकोर तपास करावा अशी मागणी भाजपच्या वतीने पोलीस आयुक्त यांच्याकडे करण्यात आली. खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या उपस्थितीत भाजपचे एक शिष्टमंडळ पोलीस आयुक्त डॉ आरती सिंह यांना भेटले आणि घटनेच्या मुख्य आरोपीचा तपास करा अशी मागणी यावेळी करण्यात आली.