मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मागील २४ तासांत देशात १२ हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्याआधीच्या दिवसाशी तुलना करता कोरोनाबाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाली आहे.
याचा अर्थ आदल्या दिवशीच्या तुलनेत कोरोनाबाधितांच्या संख्येत ३८.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सध्या देशात ५८ हजारांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर, मागील २४ तासांत ११ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मागील एक दिवसात एकूण ७,६२४ बाधितांना आजारांवर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मागील २४ तासांत १२,२१३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४,३२,५७,७३० पर्यंत पोहोचली आहे. तर, आतापर्यंत ४,२६,७४,७१२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनामुळे झालेल्या एकूण मृतांची संख्या ५,२४,८०३ इतकी झाली आहे.
आदल्या दिवशी १५ जून रोजी प्रसिद्ध केलेल्या आकेडवारीनुसार, देशात सुमारे ८ हजार कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या ही सातत्याने ८ हजारांच्या घरात होती. मात्र आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत अचानक मोठी वाढ दिसून आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे आता चौथ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळेच देशभरात लसीकरणावर भर दिला जात आहे.