मुंबई : राज्यपालांनी बोलावलेले विशेष अधिवेशनाचे हे सत्र असंवैधानिक असल्याचा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेनेच्या १६ आमदारांवरील अपात्रतेची कारवाई प्रलंबित होत असताना दुसरीकडे अशा प्रकारचे आदेश देणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपकडून राज्यघटनेच्या चिंधड्या उडवल्या जात असल्याचे त्यांनी म्हटले.
राज्यपाल कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांनी दिलेले आदेश हे राफेलच्या वेगापेक्षा अधिक वेगवान असल्याची उपरोधिक टीका त्यांनी केली.
आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात असताना दुसरीकडे बहुमत चाचणीचे आदेश देणे चुकीचे असल्याचे राऊत यांनी सांगितले. शिवसेना या आदेशाविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सुप्रीम कोर्टाकडून आशा असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यपालांनी दोन वर्षे १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. त्यानंतर आता एकाच दिवसात सरकारला बहुमत चाचणीचे आदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.