23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयहल्ल्याचा कट उधळला

हल्ल्याचा कट उधळला

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने पाकिस्तानने फंडिंग केलेल्या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करीत पाकिस्तानचे मोठे षडयंत्र उघड केले आहे. या प्रकरणी तपास यंत्रणांनी ६ जणांना अटक केली आहे. अटक केलेले संशयित हे दहशतवादी मॉड्यूल भारतात चालवत होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी त्यांचा मोठा कट उधळला आहे. त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा आणि स्फोटकेही जप्त केले आहेत. नवरात्रोत्सवात हल्ला घडवून आणण्याचा त्यांचा कट होता. दरम्यान, या दहशतवाद्यांची चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे मिळतात का, हे तपासले जात आहे. पोलिस उपायुक्त प्रमोद कुशवाह यांनी ही माहिती दिली.

या पाकिस्तानी दहशतवादी मॉड्यूलसाठी काम करणा-या ६ पैकी २ जणांनी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. या दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि दिल्ली येथे छापे टाकले आणि एकूण ६ जणांना अटक केली. या संशयित दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

पाकिस्तानस्थित दहशतवादी मॉड्यूलचे सदस्य दोन पाकिस्तानींच्या सांगण्यावरून काम करत होते. त्यांचा हेतू नवरात्र आणि इतर सणादरम्यान हल्ला करणे होता. त्यांच्याकडून आईईडीदेखील जप्त करण्यात आले आहेत. अटक केलेल्या दहशतवाद्यांचे वय २२ ते ४३ वर्षांच्या दरम्यान सांगितले जात आहे.

पोलिस आयुक्त नीरज ठाकूर यांनी सांगितले की, या दहशतवादी मॉड्यूलचे कनेक्शन डी कंपनी म्हणजे दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हे दहशतवादी मॉड्यूल आयएसआयच्या संरक्षणाखाली एक मोठा कट रचत होते. अटक केलेल्या ६ दहशतवाद्यांपैकी २ पाकिस्तानमधून प्रशिक्षण घेऊन परत आले आहेत, असे सांगण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीतून दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. याशिवाय उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधून तिघे, तर महाराष्ट्रातून एकाला अटक करण्यात आली. जान मोहमद अली शेख असे त्याचे नाव आहे. याची माहिती मिळताच महाराष्ट्र एटीएसचे पथक त्याच्या घरी दाखल झाले असून, त्याच्या कुटुंबीयांची चौकशी करण्यात आली. यासोबत मोहम्मद ओसामा असे एका दहशतवाद्याचे नाव असून तो दिल्लीचा रहिवासी आहे. इतरांची नावे जीशान कमर, मोहम्मद अबू बकर, मोहम्मद अमीर जावेद आणि मूलचंद लाला अशी आहेत.

दाऊद गँगची मदत
नवी दिल्लीत पोलिसांच्या स्पेशल सेल आणि यूपी एटीएसने ६ दहशतवाद्यांना अटक केली आहे. या सहा जणांपैकी दोन जणांना पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग देण्यात आली होती. धक्कादायक म्हणजे या सहा जणांचा अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचे समोर आले आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिमने या सहा जणांना मदत केल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांच्या दोन टीम
दहशतवाद्यांच्या दोन टीम तयार करण्यात आल्या होत्या. एक टीम दाऊद इब्राहिमचा भाऊ अनीस इब्राहिम सांभाळत होता. एका टीमला सीमेपलीकडून शस्त्रे भारतात आणणे आणि येथे लपवण्याचे काम देण्यात आले होते. दुस-या टीमला हवालाद्वारे पैशांची व्यवस्था करावी लागत होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या