लातूरमधील प्रकल्प, केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची माहिती
नवी दिल्ली : मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिवाळीपूर्वी होणार असल्याची माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली, तर लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारण्यासही मंजुरी देण्यात आली. लवकरच पिट लाईन उभारण्याच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे वैष्णव म्हणाले.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची खासदार सुधाकर शृंगारे यांनी दिल्ली येथे नुकतीच भेट घेतली. या भेटीदरम्यान लातूरला पिट लाईन उभारणीच्या कामाला मंजुरी देण्यात येत असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी सांगितले. नवीन रेल्वे गाड्यांची सुरुवात करण्यासाठी अडचण येत असल्याने लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारावी, अशी मागणी मागील अनेक वर्षापासूनची आहे. याबाबत खासदार सुधाकर शृंगारे यांनी अनेकदा रेल्वे विभागाकडे पाठपुरावा केला होता. त्याला आता यश आले आहे.
मराठवाडा रेल्वे कोच कारखाना आणि पिट लाईन संदर्भात खासदार सुधाकर शृंगारे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. या भेटीत खासदार सुधाकर शृंगारे यांनी मराठवाडा रेल्वे कोच कारखान्यासंदर्भातील संपूर्ण माहिती अश्विनी वैष्णव यांना दिली. मराठवाडा रेल्वे कोच कारखान्याचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिवाळीपूर्वी करण्यात येणार आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी आश्वस्त केल्याचे शृंगारे म्हणाले. तसेच लातूर रेल्वे स्टेशनवर पिट लाईन उभारणीच्या मागणीला या भेटीदरम्यान अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली.
पिट लाईन झाल्यानंतर
नव्या गाड्या सुरू होणार
पिट लाईनला मंजुरी देण्यात आल्याने लातूर स्टेशनवरुन नवीन गाड्या सुरुवात करण्यासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. पिट लाईनची सुविधा उपलब्ध झाल्यास रेल्वे गाड्यांची स्वछता करणे, कोचची देखभाल करणे, पाणी उपलब्ध करणे, किरकोळ दुरुस्ती अशा अनेक सुविधा उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लातूरवरून नवीन गाड्या सुरुवात करण्यास मदत होणार आहे.