26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयआरोपींची सुटका बलात्कारापेक्षा भयंकर

आरोपींची सुटका बलात्कारापेक्षा भयंकर

एकमत ऑनलाईन

तत्कालीन न्यायाधीश यू. डी. साळवी यांनी व्यक्त केली खंत
गर्भवती महिलेसह काही महिलांवर बलात्कार करून ७ जणांची केली होती हत्या
ठाणे : गुजरात येथे २००२ साली घडलेल्या दंग्यादरम्यान एका ५ महिन्याच्या गर्भवती महिलेसह काही महिलांवर बलात्कार आणि ३ वर्षाच्या मुलीसह ७ जणांच्या हत्येप्रकारणी तत्कालीन न्यायाधीश यू. डी. साळवी यांनी ११ आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या प्रकरणी आता गुजरात सरकाने या आरोपींची सुटका केली. सुटकेनंतर या आरोपींचा सत्कारदेखील करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे सेवानिवृत्त तत्कालीन न्यायाधीश यू. डी. साळवी यांनी खंत व्यक्त केली आहे.

२००२ साली गुजरात येथे दंगा उसळला होता. या दंग्यादरम्यान ५ महिन्यांची गर्भवती महिला बिल्कीस बानोसह इतर काही महिलांवर बलात्कार करण्यात आला होता. तसेच बिल्कीस बानो हिच्या ३ वर्षांच्या मुलीसह ७ जणांची हत्यादेखील करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपींना अटक करून त्यांना न्यायालयात हजर केले होते. युक्तीवाद प्रक्रिया पार पडल्यानंतर तत्कालीन न्यायाधीश यू. डी. साळवी यांनी ११ दोषी आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र, गुजरात न्यायालयाने या आरोपींची सुटका केली आहे. तसेच हे शिक्षा भोगत असलेले आरोपी बाहेर आल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. ही लाजिरवाणी बाब असून हा घटनेने दिलेल्या न्यायप्रक्रियेचा अवमान असल्याचे मत सेवानिवृत्त तत्कालीन न्यायाधीश यू. डी. साळवी यांनी व्यक्त केले आहे.

घडलेल्या घटनेतून संपूर्ण समाजाची मानसिकता प्रतीत होते. त्यामुळे हा घडलेला प्रकार बलात्कारापेक्षाही गंभीर प्रकार असल्याचे सेवानिवृत्त न्यायाधीश साळवी यांनी सांगितले. सामूहिक बलात्कारासारख्या प्रकारच्या घटना घडणे म्हणजे समाज बिघडल्याची चिन्ह आहेत. या प्रकरणात दोषी आरोपींना झालेली शिक्षा ही त्यांना आयुष्यभर भोगायची होती. परंतु त्या आरोपींना सोडायचा अधिकार तेथील सरकारचा आहे. तो त्यांनी कसा वापरला, हे फक्त आपण बघायला हवे, असेही ते पुढे म्हणाले.

एखाद्या आरोपीला शिक्षा करण्याचा उद्देश काय, तर पहिली बाजू म्हणजे कुठलाही अपराध हा समाजाच्या विरुद्ध केलेले कृत्य असते. त्यात काही कृत्ये अशी असतात की, त्यांनी समाजात राहणे हे धोकादायक असते. म्हणून त्याला समाजापासून विलग करून जन्मठेपेची शिक्षा दिली जाते, तर दुसरी बाजू अशी की त्यांची तुरुंगात राहून काय सुधारणा होत आहे का, त्याच्या मानसिकतेत काय सुधारणा होत आहे का हे पाहणे. परंतु या घटनेतून आरोपींच्या मानसिकतेत सुधार झाल्याचे दिसून येत नाही. ते आपला सत्कार स्वीकारत आहेत. त्यामुळे हे सगळे चुकीचे असल्याचे मत सेवानिवृत्त तत्कालीन न्यायाधीश यू. डी. साळवी यांनी व्यक्त केले आहे.

सुप्रीम कोर्टाने फटकारले
सध्या या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारला फटकारले असून नोटीस बजावत येत्या २ आठवड्यात या प्रकारणाचा सविस्तर जबाब मागितला आहे. परंतु अशा प्रकारची घटना घडणे आणि या घटनेनंतर त्यातील दोषी आरोपींचा सत्कार होणे हे समाजासाठी लाजिरवाणे असल्याची प्रतिक्रिया सर्वत्र उमटत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या