मुंबईः कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेले सलून आणि ब्यूटी पार्लर्स उद्या शुक्रवारपासून उघडण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. सकाळी ९ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियम व अटी पाळून सलून आणि ब्यूटी पार्लर्स उघडी ठेवता येतील. रेड झोनमधील कंटेनमेंट वसाहती वगळता सर्व झोनमध्ये ही परवानगी देण्यात आली आहे.
लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाल्यानंतर राज्य सरकारने हळूहळू अनेक प्रतिबंधित सेवांमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. त्याच धर्तीवर आता सलून आणि ब्युटी पार्लर सुरु करण्यास परवानगी देण्याची परवानगी देण्यात आली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांच्या स्वाक्षरीने गुरुवारी याबाबतचे आदेश काढण्यात आले. या आदेशाच्या प्रती प्रत्येक महापालिका, नगरपालिकेला पाठवल्या आहेत. काही अटींच्या आधीन राहून सलून व ब्यूटी पार्लर सुरु करण्यास परवानगी देण्यात येत आहे, असे या आदेशात नमूद केले आहे. अध्यादेशात नमूद अटी पाळणे संबंधितांना बंधनकारक आहे.
Read More TikTok शी स्पर्धा करण्यासाठी Facebook लाँच करणार शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अॅप Collab
दाढी, फेशियल, ब्लिचिंगला मात्र बंदीः शासनाकडून केवळ हेअर कट, हेअर ड्राय, वॅक्सिंग, थ्रेडिंग याच सेवांना परवानगी देण्यात आली आहे. दाढी, फेशियल, ब्लिचिंग व त्वचेच्या संबंधित अन्य सेवांना परवानगी दिलेली नाही. त्यामुळे या सेवा देता येणार नाहीत.
या नियमांचे पालन करणे बंधनकारकः सलून किंवा ब्यूटी पार्लर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंतच सुरू ठेवता येईल. परवानाधारक किंवा अधिकृत व्यावसायिकांनाच हा व्यवसाय करता येईल. अपॉइन्टमेंट घेवून आलेल्या ग्राहकांनाच सेवा द्यावी. अपॉइन्टमेंट न घेता आलेल्या ग्राहकाला सेवा देऊ नये. सलूनमध्ये असलेल्या खूर्च्यांच्या पन्नास टक्के व्यक्तींनाच प्रवेश द्यावा, असे निर्बंध घालण्यात आले आहेत.
सुरक्षेसाठी या आहेत अटीः
- प्रत्येक सलून, ब्यूटीपारलर चालकाने इन्फ्रारेड थर्मामीटरच्या माध्यमातून प्रत्येक ग्राहकाची तपासणी करणे बंधनकारक असेल. तपासणीतून एखादा व्यक्ती करोना संशयित वाटल्यास तर त्याला प्रवेश देऊ नये.
- ग्राहक व सलूनचालक या दोघांनी मास्क घालणे बंधनकारक आहे. सलूनमधील कर्मचार्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने मास्क, ग्लोव्हज वापरणे बंधनकारक आहे.
- सलून किंवा ब्यूटीपार्लरच्या प्रवेश व्दारावर हँड सॅनिटायजर उपलब्ध करुन द्यावे.
- सलूनमधील सर्व खूर्च्यांचे ०.१ सोडियम हायड्रोक्लोरीटने प्रत्येक ग्राहकाच्या नंतर निर्जतुकीकरण करावे.
- प्रत्येक ग्राहकासाठी डिस्पोजेबल टॉवेल, नॅपकीन वापरावा.
- जे साहित्य डिस्पोज करता येणार नाही ते सॅनिटाइज, निर्जंतुकीकरण करुन वापरावे.
- सलूनचा परिसर (ग्राहकांना बसण्याची जागा, पाय़र्या, व्हरंडा) दिवसातून पाच वेळा सॅनिटाइज करावा.फरशी आणि कार्पेट सतत स्वच्छ करावे.
- प्रत्येक ग्राहकाला डिस्पोजेबल साहित्य सोबत आणण्याची व परत नेण्याची मुभा असेल (कात्री, कंगवा इत्यादी) किंवा जास्त पैसे देवून सेवा घेण्याचा त्याच्याकडे पर्याय उपलब्ध असेल.