23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeशोधमोहीम थांबविली; तळीयेत ८२ मृत्युमुखी, ५० मृतदेह बाहेर, अद्याप ३२ बेपत्ताच

शोधमोहीम थांबविली; तळीयेत ८२ मृत्युमुखी, ५० मृतदेह बाहेर, अद्याप ३२ बेपत्ताच

एकमत ऑनलाईन

रायगड : रायगड जिल्ह्यात महाड तालुक्यातील तळीये गावात घरांवर दरड कोसळल्याने अख्खे गावच दरडीखाली गाडले गेले. त्यानंतर येथे शोधकार्य वेगात सुरू करण्यात आले. परंतु एनडीआरएफसह लष्करी पथकाला रविवारपर्यंत ५० मृतदेह काढण्यात यश आले. अद्याप ३२ जण बेपत्ता आहेत. त्यामुळे येथे ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे जाहीर करण्यात आले. परंतु दरड कोसळल्याने गावात सर्वत्र राडारोडा असल्याने शोध घेणे गठीण जात असल्याने आज अखेर शोधमोहीम थांबविण्यात आली असून, यासंबंधीचा निर्णय जिल्हा प्रशासनाने जाहीर केला.

मागील काही दिवसांमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका कोकण, चिपळूण, महाड, रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली आदी जिल्ह्यांना बसला आहे. यामुळे विविध दुर्घटनांत कित्येकांना जीव गमावावा लागला. अनेकांचे संसार उध्वस्त झाले, अनेकजणांचे नातलग अद्यापही बेपत्ता आहेत, तर आजही अनेक गावे व शहरांना पुराने वेढा दिलेला असल्याने तेथील नागरिक मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, दरड कोसळलेल्या अनेक ठिकाणी अद्यापही मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मात्र, तळीये, सातारा जिल्ह्यातील अंबेघर येथील शोधकार्य थांबविण्यात आले.

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूर, दरडी कोसळून जवळपास सव्वाशे लोकांचा बळी गेला आहे, तर साडेतीन हजारांहून अधिक जनावरे दगावली आहेत.जनावरांच्या मृत्यूचे प्रमाण यापेक्षाही अधिक असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, पुरामुळे कोल्हापूर, सांगलीत १,३५,३१३ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले असून यात कोल्हापूरमधील ४०,८८२ तर सांगलीत ७८,१११ नागरिकांचा आहे.

खेडमध्ये अजूनही ९ बेपत्ता
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात पोसरे बौद्धवाडी व बिरमणी येथील दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज दुपारपर्यंत ८ मृतदेह आढळले आहेत. यापैकी ७ मृतांची ओळख पटली आहे. दरम्यान, ९ जण अजूनही बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. गेल्या चार दिवसांपासून येथे अविश्रांतपणे यंत्रणा दगड आणि मातीचा ढिगारा उपसत आहेत. आतापर्यंत ८ मृतदेह ढिगा-याखाली आढळले असून त्यातील ७ जणांची ओळख पटली आहे.

सातारा जिल्ह्यात बळींची संख्या ३७ वर
सातारा जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दरडी कोसळून, पुराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टीमुळे घडलेल्या दुर्घटनांमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या ३७ वर पोहोचली आहे, तर ५ जण अद्यापह बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी मदतकार्य, शोध मोहीम व बचाव कार्य सुरू आहे. सातारा जिल्ह्यात पाटण, महाबळेश्वर, जावली आणि वाई येथे १२ ठिकाणी डोंगरकडे कोसळून झालेल्या दुर्घटनांत अनेक घरे गाडली गेली. अद्याप २२ लोक बेपत्ता आहेत. पाटण तालुक्यातील खालचे आंबेघर गावाला सर्वाधिक फटका बसला असून, एका १० महिन्यांचा चिमुकलीचा शोध लागत नसल्याने ग्रामस्थांच्या विनंतीवरून येथेही बचावकार्य थांबविले.

कोल्हापूरला पुन्हा महापुराचा धोका
कोल्हापूर जिल्ह्यातील महापुराचा विळखा सैल होत असताना आता राधानगरी धरणाचे ४ दरवाजे उघडल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊन पुन्हा महापुराचा धोका निर्माण झाला आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी घटून ५१ फुटावर आली आहे. मात्र, या पाणीपातळीत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यामुळे पुणे ते बंगळुरू महामार्ग सायंकाळपर्यंत बंदच ठेवण्यात आला होता. कोल्हापूर शहरातील काही भागात घुसलेले पाणी अजूनही जैसे थे आहे.
पित्यासह २ मुलांचा बुडून मृत्यू,

नांदेड जिल्ह्यातील रहिवासी
मावळ तालुक्यातील कामशेत जवळील कुसगाव खुर्द येथे पाण्याच्या एका खोल डबक्यात दोन लेकरांसह वडिलांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना रविवारी सकाळी घडली. पिराजी गणपती सुळे (४५), साईनाथ पिराजी सुळे (१४), सचिन पिराजी सुळे (११ तिघेही रा. सध्या इंद्रायणी कॉलनी, कामशेत, मावळ, मूळ रा. नायगाववाडी जि.नांदेड) अशी बुडून मृत्यू झालेल्या बापलेकांची नावे आहेत.

धवन सेनेची ट्वेंटी-२० तही विजयी सलामी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या