मुंबई : राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर हे सरकार किती दिवस टिकणार याची चर्चा रंगली आहे. पण आता शिंदे सरकार पाडण्यासाठी भविष्यवाणीचाही आधार घेतला जात असल्याचे समोर आले आहे. खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सरकार सहा महिन्यांत पडेल असं एका ज्योतिष्याने सांगितले आहे, असा दावा केला आहे. विशेष म्हणजे, जयंत पाटलांनी हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाच सांगितले.
शिवसेनेत बंडखोरी करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार स्थापन केले आहे. अजूनही या सरकारचा खातेवाटप बाकी आहे. पण, त्याआधीच हे सरकार सहा महिन्यात कोसळले जाणार असे भाकित वर्तवले जात आहे. राष्ट्रवादीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये जयंत पाटील यांनी शिंदे सरकारबद्दल भविष्यवाणीची सांगितली.
सहा महिन्यात शिंदे आणि फडणवीस सरकार पडणार आहे, असं आपल्याला एका ज्योतिषीने सांगितले आहे असा दावा जयंत पाटलांनी केला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमोर हे वक्तव्य पाटील यांनी केले आहे. मात्र शरद पवार यांनी आपला ज्योतिष्यावर विश्वास नसल्याचे स्पष्ट केले आहे.