औरंगाबाद : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसेनेत उभी फूट पडली असून जनता जनार्दन आता कोणाच्या बाजूने कौल देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल हाती आले आहेत. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, उस्मानाबाद आदी ठिकाणचे निकाल जाहीर होत आहेत. यापैकी बहुतांश ठिकाणी एकनाथ शिंदे पुरस्कृत पॅनलचा विजय होताना दिसत आहे.
औरंगाबादमध्ये प्रतिष्ठेची ठरलेल्या वडगाव कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर देखील शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्या पॅनलचा सुरुवातीलाच दणदणीत विजय झाल्याचे दिसून आले आहे. मराठवाड्यातील सर्व ग्रामपंचायतींचे निकाल येणे अद्याप बाकी असून सुरुवातीला लागलेल्या निकालांची माहिती येथे देण्यात आली आहे.
- औरंगाबादेत शिरसाटांचा प्रभाव कायम
औरंगाबादेत वडगाव-कोल्हाटी-बजाजनगर ग्रामपंचायतीवर १७ जागांपैकी ५ जागांवर आमदार संजय शिरसाट यांच्या गटाचा विजय झाला आहे. यात सुनील काळे, सुनीता साळे, छायाताई प्रधान, विष्णू उगले, माधुरी सोमासे यांचा विजय झाला आहे.
पैठण तालुक्यातील ७ पैकी ६ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांच्या पॅनलचा दणदणीत विजय येथे झाला. अपेगाव, खेर्डा, नानेगाव, शेवता, अगरनांदर, गावतांडा या ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात आल्याचे दिसून येत आहे.
अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघातही शिंदे गटाने झेंडा फडकवला. तीनपैकी २ ग्रामपंचायतींवर शिंदे गट विजयी झाला आहे. नानेगाव आणि जंजाळ या दोन ग्रामपंचायती अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात आल्या आहेत.
- लातुरात महाविकास आघाडीला कौल
लातूर जिल्ह्यातल्या पानगाव या मोठ्या ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीला यश मिळाले आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने मिळून पॅनल उभे केले होते. त्यात त्यांना यश मिळाले आहे. या ग्रामपंचायतीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पानगाव ही ग्रामपंचायत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाची ग्रामपंचायत मानली जाते.
लातूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकीत रेणापूर तालुक्यातील रामवाडी ही ग्रामपंचायत भाजपाप्रणीत पॅनलने जिंकली आहे. येथे महेंद्र गोडभरले आणि सुरेंद्र गोडभरले यांच्या पॅनलने विजयी मिळवला आहे. - उस्मानाबादेत भाजपचे कमळ
उस्मानाबादेत कळंब तालुक्यातील दाभा ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा फडकला आहे. ७ पैकी ६ जागा जिंकत भाजपचा एकहाती विजय झाला. महाविकास आघाडीला केवळ एका जागेवर विजय मिळाला. सरपंचपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. या जागेवरही भाजपचा उमेदवार निवडून आल्याने सरपंच भाजपचा होणार हे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत येथे झाली. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कामठा गावात सत्ताधारी भाजपला धक्का बसला असून सर्वपक्षीय पॅनल विजयी झाले आहे. - परभणीत भाजप-राष्ट्रवादीची युती
राज्यात भाजप, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेचा सत्ता संघर्ष सुरू असताना परभणीच्या सेलू येथे भाजप-राष्ट्रवादीने युती करत बाजी मारली आहे.