25.8 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeमहाराष्ट्रराज्य शासनाचे संगीत विद्यापीठ उभारणार

राज्य शासनाचे संगीत विद्यापीठ उभारणार

एकमत ऑनलाईन

पुणे : राज्यात संगीताचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे संगीत विद्यापीठ उभारावयाचे असून त्यासाठी भारती विद्यापीठाने सहकार्य करावे , असे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केले.
भारती विद्यापीठाच्या ५८ व्या वर्धापन दिन सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला कृषि व सहकार राज्यमंत्री तथा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.विश्वजीत कदम, स्ट्रॅटजिक फोरसाईट ग्रुपचे संदिप वासलेकर, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, गौर गोपाल दास, आनंदराव पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, विजयमाला कदम आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, भारती विद्यापीठाला वैश्विक स्वरूप लाभले आहे. यामागे डॉ. पतंगराव कदम यांची दूरदृष्टी होती. आज जगातील नामांकित विद्यापीठ म्हणून विद्यापीठाची ओळख आहे. विद्यापीठाने साहित्य, संगीत, क्रीडा क्षेत्रात विस्तार करताना सामाजिकता जपली. विद्यापीठाने संगीत शिक्षणाच्या सुविधा अनेक ठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. या अनुभवाचा शासनाला उपयोग होईल.
आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणा-या भारती विद्यापीठ सारख्या संस्थांना शासनातर्फे सर्व सहकार्य करण्यात येईल. विद्यापीठाने वैद्यकीय संशोधनाच्या क्षेत्रात कार्य करताना राज्यात आपला विस्तार वाढवावा आणि मराठवाड्यातही ज्ञानदानाचे कार्य सुरू करावे, असे आवाहन त्यांनी केले. वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात संशोधानासाठी निधी राखून ठेवला जाईल असेही देशमुख म्हणाले.

राज्यमंत्री डॉ. कदम म्हणाले, स्व.पतंगराव कदम यांनी स्वत: प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शाळा, महाविद्यालय आणि भारती विद्यापीठ सुरू केले. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करण्यासाठी भारती विद्यापीठाने ग्रामीण भागात शाळा सुरू केल्या, मुलींच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न केले. पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन विद्यापीठाने पर्यावरण शास्त्राचा अभ्यासक्रम सुरू केला. देशाला घडविणारे संस्कारक्षम नागरिक घडविण्याचे काम करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी गौर गोपाल दास म्हणाले, प्रत्येकात पूढे जाण्याची क्षमता आहे, मात्र जीवनात प्रगती साधताना सेवा, समाधान, समाजासाठी योगदान आणि आनंदाचाही विचार तेवढाच महत्वाचा आहे. वासलेकर म्हणाले, संशोधनातील अत्युच्च गुणवत्ता जोपासणे आणि शिक्षण क्षेत्रात जागतिक मानके प्रस्थापित करण्यासाठी क्रियाशील राहणे गरजेचे आहे. पर्यावरण क्षेत्रात जागतिक ख्यातीच्या संस्थांसोबत काम करण्याचा प्रयत्न करावा.संशोधनावर अधिक भर आणि अभ्यासक्रमात कौशल्याचा समावेश आवश्यक असल्याचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण मंत्री देशमुख यांच्या हस्ते विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फिजिओथेरपी या शाखेचे उदघाटन करण्यात आले. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या प्राध्यापकांना डॉ. पतंगराव कदम सेवा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल राज्यमंत्री डॉ. कदम यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. रमाईरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला कदम यांचा सत्कारदेखील देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला.
कोरोना काळातील सेवेसाठी विद्यापीठातील डॉक्टरांचा मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक सत्कार करण्यात आला. विद्यापीठाचे मुखपत्र असणा-या विचारभारती मासिकाच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
——————–

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या