पुणे : राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. नदी-नाल्यांना पूर आल्यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना मोठा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबई आणि परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. सध्या पावसाचा जोर काहीसा कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
मराठवाडा आणि विदर्भात या मुसळधार पावसाचा मोठा फटका शेती पिकांना बसला आहे. पावसाचा जोर कमी झाल्याने गडचिरोली, चंद्रपूर या भागातील नद्यांची पाणी पातळी घटली असून, पूरही ओसरला आहे. मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने विदर्भाची चिंता वाढवली आहे. तसेच मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
वाशिम, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांत पाऊस
वाशिम जिल्ह्यात सकाळपासून पावसाने हजेरी लावली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्याला आज येलो अलर्ट दिला आहे.
यवतमाळ जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरू आहे.
अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे आणि ३०९ गावे प्रभावित
राज्यात एक जूनपासून आजपर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे २८ जिल्हे आणि ३०९ गावे प्रभावित झाली असून ८३ तात्पुरती निवारा केंद्रं तयार करण्यात आली आहेत. आतापर्यंत १४ हजार ४८० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अतिवृष्टीमुळे ११० नागरिकांनी आपला जीव गमावला आहे तर २१८ प्राणी दगावले आहेत.
नांदेड जिल्ह्यात शेतीचे मोठे नुकसान
नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चालू असलेल्या संततधार पावसामुळे नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. तर अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक बाधित क्षेत्र हे नांदेड जिल्ह्यातील आहे. ज्यात अतिवृष्टीने जिल्ह्यातील ३ लाख हेक्टरवरील सोयाबीन, उडीद, मूग, हळद, ऊस, कापूस, केळी, भाजीपाला व फळपीक शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर या सतत होणा-या पावसामुळे पिके अक्षरश: सडून गेली असून उभ्या पिकात पाणी साचल्याने शेतीचे तळे झाले आहे.
परभणीत पिकांचे नुकसान
परभणीत यंदा पाऊस उशिरा सुरू झाला असला तरी जुलै महिन्यात मात्र पावसाने सर्वत्र चांगली हजेरी लावली आहे. दोन दिवसांच्या उघडिपीनंतर आज पुन्हा पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. शहरासह जिल्हाभरात सतत पडणा-या पावसाने प्रकल्पांमधील पाणीसाठा वाढत असला तरी सोयाबीनचे या पावसाने नुकसान होण्याची शक्यता आहे. एकीकडे पिके पिवळी पडत आहेत तर दुसरीकडे या पावसाने शेतक-यांना शेतात जाता येत नसून फवारण्याही रखडल्या आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात संततधार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र पावसाची संततधार सुरू आहे. गेले दोन दिवस जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, आज सकाळपासून जिल्ह्यात संततधार पाऊस कोसळत आहे. जिल्ह्यात भात शेतीची कामे शेवटच्या टप्प्यात आहेत. संततधार पावसामुळे बळिराजाला थोडासा दिलासा मिळत आहे.
ओला दुष्काळ जाहीर करावा : अजित पवार
विदर्भ, मराठवाड्यासह अतिवृष्टी झालेल्या राज्यातील इतर विभागात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा. अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेले शेतजमीन आणि पिकांचे नुकसान लक्षात घेऊन शेतक-यांना, नागरिकांना दिलासा देण्यासाठी विधिमंडळाचे अधिवेशन तातडीने बोलावण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. दरम्यान यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघांनाही पत्र लिहिले आहे.