27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeमहाराष्ट्रनिवडणूक आयोगाच्या नोटिसीविरोधात सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्ट तयार

निवडणूक आयोगाच्या नोटिसीविरोधात सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्ट तयार

एकमत ऑनलाईन

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा

नवी दिल्ली : निवडणूक आयोगाच्या नोटिसीविरोधात शिवसेनेने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर ही याचिका कोर्टाकडून स्वीकारण्यात आली आहे. शिवसेनेच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाने तयारी दर्शवल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा एक मोठा दिलासा मानला जात आहे.

एकनाथ शिंदे गटाच्या याचिकेवरील निवडणूक आयोगाच्या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी मागणी शिवसेनेने केली होती. सुप्रीम कोर्ट १ ऑगस्टला इतर याचिकांसह शिवसेनेच्या या मागणीवरही सुनावणी घेणार आहे.

बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय होईपर्यंत खरा शिवसेना पक्ष कोणता हे निवडणूक आयोग ठरवू शकत नाही, असे उद्धव ठाकरे गटाने म्हटले आहे. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट यांनी शिवसेनेवरील दाव्यासंदर्भातील कागदपत्रे ८ ऑगस्टपर्यंत दाखल करण्याच्या निवडणूक आयोगाच्या आदेशालाच उद्धव ठाकरे यांच्या गटाने आव्हान दिले.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना पक्षांतर्गत सुरू असलेल्या विरोधाची कारणे लेखी देण्यास सांगितले आहे. मात्र निवडणूक आयोगाचा हा आदेश असंवैधानिक आणि घाईघाईने घेतलेला निर्णय असल्याचे उद्धव ठाकरे गटाचे म्हणणे आहे. ठाकरे गटाचे शिवसेना सरचिटणीस सुभाष देसाई यांनी ही याचिका दाखल केली होती. सुप्रीम कोर्टाने अखेर या याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिला आहे.

शिवसेनेने याचिकेत नेमके काय म्हटले आहे?
शिंदे गट बेकायदेशीरपणे संख्या वाढवून संघटनेत कृत्रिम बहुमत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे याचिकेत म्हटले आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात आधीच प्रलंबित आहे. निवडणूक आयोग या प्रकरणावर पुढे गेल्यास अपरिमित नुकसान होईल, जे न्यायालयीन कामकाजात हस्तक्षेप करण्यासारखे आहे. जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे त्याची चौकशी करणे हा न्यायालयाचा अवमान आहे, असेही ठाकरे गटाचे म्हणणे आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या