श्रीनगर : श्रीनगरमधील नवाकदल या जुन्या भागात सोमवारी रात्री दहशतवादी आणि निम लष्करी दलाचे जवान यांच्यात झालेल्या चकमकीत फुटीरवादी नेत्याच्या दहशतवादी मुलगा आणि अन्य एक दहशतवादी मारले गेले़ आॅक्टोबर २०१८ नंतर श्रीनगरमध्ये झालेली ही पहिली चकमक आहे. जुनैद सेहराय असे या दहशतवाद्याचे नाव असून तो हिजबुलचा क्रमांक दोनचा कमांडर होता़ जुनैद हा तहरीक-ए-हुर्रीयत या फुटीर संघटनेच प्रमुख मोहम्मद अश्रफ सेहराय यांचा मुलगा होता.
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिजबुलचा मुख्य कमांडर रियाज नायकू मारला गेल्यानंतर या संघटनेला बसलेला हा दुसरा मोठा हादरा आहे़ रियाज नायकू नंतर तोच मध्यकाश्मीरात दहशतवादी कारवायांचे नियंत्रण करत होता़
पोलिस महासंचालक दिलबागसिंग यांनी सांगितले की, या चकमकीत जुनैद सेहरायसह तारिक अहमद शेख हा दुसरा दहशतवादी ठार झाला आहे़ जुनैद हा श्रीनगरचा तर तारिक शेख हा पुलवामाचा रहिवाशी होता़ या दोघांचाही अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता.
Read More काश्मिरातील पाकपुरस्कृत कारवायांत सहभागी नाही
दोन वर्षांपुर्वी जुनैद हा दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता़ यापुर्वी आॅक्टोबर २०१८ मध्ये श्रीनगरमध्ये झालेल्या चकमकीत लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे दोन दहशतवादी ठार झाले होते़ त्यात लष्करचा कमांडर मेहराज-उद्दीनचा समावेश होता़ पोलिसांनी तयार केलेल्या दहशतवादी यादीत त्याचा वरचा क्रमांक होता़ सोमवारी रात्री जम्मू काश्मीर पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस यांनी संयुक्तरित्या मोहिम राबवून हे दहशतवादी लपलेल्या नवाकदल या भागाला वेढा घातला. सोमवारी रात्री या चकमकीनंतर सकाळपर्यंत तेथे शांतता होती पण, मंगळवारी सकाळी तेथे लपलेल्या दहशतवाद्यांनी पुन्हा गोळीबार केला़ त्यात एक पोलिस आणि एक निमलष्करी दलाचा जवान जखमी झाले़ त्यामुळे पोलिसांनी ते घरच उडवून दिल्याने हे दोघेही मारले गेले़
हिजबुल दहशतवाद्याला अटक
जम्मू-काश्मीरमधील डोडा जिल्ह्यात सक्रीय असलेल्या हिजबुलच्या दहशतवाद्याला भारतीय सुरक्षा रक्षकांनी अटक केली आहे. या दहशतवाद्याकडे एक बंदूक सापडली होती. टटना शेखापुरा भागात एक दशहतवादी लपलेल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सर्च आॅपरेशन करण्यात आले होते. भारतीय सुरक्षा रक्षक, निमलष्करी दल आणि जम्मू आणि पोलिस यांच्यामार्फत हे सर्च आॅपरेशन चालवले. दहशतवाद्याला चारही बाजूने घेरण्यात आले. यावेळी दहशतवाद्याने पळ काढताना त्याला अटक करण्यात आली होती.