पुणे – पुणे जिल्ह्यातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणा सज्ज झाली असून पोलिसांनी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली आहे. मात्र या कारवाईत धक्कादायक गुन्हे उघड झाले असून ३ महिलांनी तब्बल २०० तोळे सोन्याचे दागिने लंपास केल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान पुणे येथे चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी ३ महिला गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. चोरी करणा-या महिला या बीड तसेच जालना या जिल्ह्यातील असून बंगल्याबाहेर त्यांनी अनेक वेळा येऊन भिकारी असल्याचा बनाव रचला होता. अनेक वेळा या महिला अल्पवयीन मुलाला सोबत घेऊन या बंगल्यात भीक मागण्यासाठी जात असत. यावेळी गरीब असल्यामुळे बंगल्यातील काहीजण त्यांना अनेक वेळा दुपारी खायला द्यायचे. याच गोष्टीचा फायदा घेत या महिलांनी या बंगल्याची रेकी केली.
घरातील सगळेजण बाहेर कधी जातात आणि कधी परततात याची माहिती या महिलांनी जमवली होती. ११ डिसेंबर रोजी या महिलांनी घरात कोणी नसताना घराच्या मागील बाजूने बेडरूममध्ये असलेले लॉकर तोडून त्यातील दागिने आणि इतर वस्तू घेऊन पळ काढला.
घरी परतल्यानंतर फिर्यादी यांना हा सगळा प्रकार निदर्शनास आला आणि त्यांनी तात्काळ पोलिस ठाणे गाठले.
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह परदेशी चलन तसेच मौल्यवान किमतीचे घड्याळ आणि इतर वस्तू महिलांनी लंपास केल्या होत्या. याप्रकरणी पोलिसांनी २ महिलांना जालना आणि बीडमधून अटक केली असून त्यांच्याकडून ८० तोळे सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू जप्त केल्या.