तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं; महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या

226

बीड  : एकाच कुटुंबातील शेतीच्या वादातून तिघांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच आज आणखी एका तिहेरी हत्याकांडाने बीड हादरलं आहे. आई आणि दोन मुलांची राहत्या घरात निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीड शहरातील पेठ बीड भागात आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास एकाच घरात तिघांचे मृतदेह आढळून आले. संगीता संतोष कोकणे ( वय 31 ), संदेश संतोष कोकणे ( वय 10 ) मयूर संतोष कोकणे (वय 7) असं मृत्यूमुखी पडलेल्या मायलेकांचे नाव आहे.

Read More  कोरोनाची चाचणी करण्यास नकार: भावंडांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू

यामध्ये संगीता आणि संदेश यांचे मृतदेह एका खोलीत आढळून आले तर मयूरचा मृतदेह पाण्याच्या बॅरलमध्ये आढळून आला आहे. खोलीत मृतदेहाजवळ घरातील साहित्य अस्ताव्यस्त झालेले होते. मोठा दगड आणि रक्त लागलेली क्रिकेटची बॅटही आढळून आली आहे. दगड आणि बॅटने दोन्ही माय-लेकांचा खून झाला असावा असा अंदाज व्यक्त होत आहे. दरम्यान तिघांची हत्या करुन आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळते आहेत.

या घटनेची माहिती मिळताच पेठ बीड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. थरकाप उडवणाऱ्या या हत्याकांडाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. मात्र, ही घटना कौटुंबिक वादातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून पोलिसांनी मृत महिलेच्या पतीला ताब्यात घेतले असल्याची माहिती खात्रीलायक सुत्रांकडून मिळते आहे. दरम्यान एकाच कुटुंबातील तिघांचे मृतदेह घरात आढळल्यानं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपुर्वीच बीडमध्ये शेतीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची हत्या झाली होती.