नवी दिल्ली : लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहात मंगळवारी ११ व्या दिवशीही प्रचंड गदारोळ झाला. दुपारी दोन वाजता पुन्हा सुरू झालेले राज्यसभा आणि लोकसभेचे कामकाज घोषणाबाजीत बुधवारपर्यंत तहकूब करण्यात आले. रमा देवी यांनी लोकसभेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांनी लोकशाही वाचवाचे पोस्टर फडकवण्यास सुरुवात केली. या कारवाईदरम्यान काही खासदारांनी ‘मोदीजी शर्म करो’च्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यानंतर लोकसभेचे कामकाज बुधवार, २९ मार्चपर्यंत तहकूब करण्यात आले. तत्पूर्वी सकाळच्या सत्रात काँग्रेससह विरोधी पक्षांनी अदानी प्रकरणावरील जेपीसी मागणी आणि राहुल गांधी यांना अपात्र ठरवण्याच्या मुद्यावरून गदारोळ केला. त्याचवेळी भाजप खासदारांनी राहुल गांधींच्या माफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.
लोकसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभापतींवर कागदाचे तुकडे फेकले आणि काळे कपडे दाखवले. काँग्रेस खासदारांच्या विरोधामुळे कामकाज एक दिवस आधी तहकूब करण्यात आले. गेल्या १० दिवसात संसदेत जवळपास कोणतेही कामकाज झालेले नाही. लोकसभा सचिवालयाने राहुल गांधींना बंगला रिकामा करण्याची नोटीस दिल्यावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, सरकार राहुल गांधींना कमकुवत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. जर त्यांनी बंगला रिकामा केला तर ते त्यांच्या आईकडे किंवा माझ्याकडे येऊ शकतात. मी बंगला रिकामा करीन. दुसरीकडे भाजप संसदीय पक्ष आणि विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी स्वतंत्र बैठका घेतल्या. सकाळी ९.३० वाजता भाजपची बैठक सुरू झाली. त्याचवेळी काँग्रेसने १०.३० वाजता बैठक घेतली. ज्यात काळे कपडे घालून आंदोलन सुरू ठेवण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
भाजप सामाजिक न्याय सप्ताह साजरा करणार
सभागृह सुरू होण्याच्या दीड तास आधी भाजपने संसदीय समितीची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सर्व खासदार आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत ईशान्येतील विजयानंतर पंतप्रधानांचा सत्कार केला. यादरम्यान ६ एप्रिल रोजी भाजपच्या स्थापना दिनाबाबतही नियोजन करण्यात आले. भाजप ६ एप्रिल ते १४ एप्रिलदरम्यान सामाजिक न्याय सप्ताह साजरा करणार आहे.
काँग्रेसचा ब्लॅक प्रोटेस्ट सुरूच
सोमवारी रात्री काँग्रेस प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी झालेल्या बैठकीत १८ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप केला. त्यांनी मंगळवारीही नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात काळे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.