22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeऔरंगाबादपोलिस आयुक्त कार्यालयातच महिलेची आत्महत्या

पोलिस आयुक्त कार्यालयातच महिलेची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : शेजारच्या सोबत सुरू असलेल्या वादात स्वत:चा नवराच आपली साथ देत नसल्याने आणि बेदम मारहाण करत असल्याने औरंगाबादच्या सविता दीपक काळे नावाच्या महिलेने थेट पोलिस आयुक्त कार्यालयातच स्वत:ला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याची घटना दोन दिवसांपूर्वी समोर आली होती.

त्यानंतर आता याप्रकरणी औरंगाबादच्या वाळूज पोलिस ठाण्यात महिलेच्या पतीसह एकूण पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यात पोलिस कर्मचा-यांचासुद्धा समावेश आहे.

मृत महिला सविता यांचा पती दीपक काळे चालक असून त्याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा सविता यांना संशय होता. यातून ती महिला, तिचा पती आणि मुलगा सविता यांच्यासोबत नेहमी भांडत होते. विशेष म्हणजे यात त्यांना सविता यांचा पती साथ देत होता. अनेकदा दीपक काळे हा आपल्या पत्नीला मारहाणसुद्धा करायचा. त्यामुळे याबाबत वाळूज पोलिस ठाण्यात सविता यांनी गुन्हा दाखल केला होता. मात्र पोलिस दुर्लक्ष करत असल्याची सविताची तक्रार होती.

त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत थेट पोलिस आयुक्तांच्या कार्यालयाच्या पाय-यांवर जाऊन स्वत:ला पेटवून घेतले. ज्यात त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्यात मयत महिलेचा पती दीपक मनोहर काळे (वय ४२ वर्षे, औरंगाबाद), शेजारी असलेले अशोक शेळके, गोकुळ अशोक शेळके यांच्यासह अशोक शेळके यांच्या पत्नी आणि वाळूज पोलिस ठाण्यातील एका पोलिस कर्मचा-यांचा समावेश आहे. तर यापैकी तीन जणांना अटक करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे सविता यांना मारहाण करतानाचा एक सीसीटीव्ही व्हीडीओ सुद्धा समोर आला आहे. सविता यांच्या भावाने हा व्हीडीओ पोलिसांना दिला आहे. ज्यात सविता यांना खाली पाडून तीन-चार लोक बेदम मारहाण करत असल्याचे दिसत आहे. तर सततच्या मारहाणीला आणि छळाला कंटाळून सविता यांनी आत्महत्या केली असल्याचा आरोप त्यांच्या माहेरच्या लोकांनी केला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या