Saturday, September 23, 2023

दिल्लीत जगातील सर्वांत मोठे कोविड १९ केंद्र सुरू

नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील छत्तरपूर येथे राधा स्वामी सत्संग ब्यास या धार्मिक संस्थेच्या भव्य पटांगणावर उभारलेल्या जगातील सर्वांत मोठ्या कोविड-१९ शुश्रूषा केंद्राचे रविवारी उद््घाटन झाले. या ठिकाणी एकूण १० हजार खाटांची सोय असून, त्यांचा वापर प्रामुख्याने सौम्य लक्षणे दिसणाऱ्या किंवा लक्षणे न दिसणा-या राजधानीतील कोरोना रुग्णांसाठी ‘आयसोलेशन सेंटर’ म्हणून केला जाईल.

‘सरदार पटेल कोविड केअर सेंटर अ‍ॅण्ड हॉस्पिटल’ असे नामकरण केलेल्या या अत्यंत आधुनिक व सर्व सोयींनी परिपूर्ण अशा सुविधा केंद्राचे उद््घाटन दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजाल यांनी केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनीही या केंद्रास नंतर स्वतंत्रपणे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी करूनकौतुक केले.

राधास्वामी सत्संग व्यास संस्थेने पटांगण यासाठी उपलब्ध करून दिले. पूर्णपणे वातानुकुलित लोखंडी मंडपाच्या स्वरूपात उभारलेल्या या हंगामी इस्पितळवजा शुश्रूषा केंद्राचा एकूण परिसर फूटबॉलच्या २० मैदानांएवढा आहे. येथील एकूण १० हजार खाटा विविध वॉर्डमध्ये विभागलेल्या असून यातील प्रत्येक वॉर्डला लडाखच्या गलवान खो-यात चीनशी लढताना हौतात्म्य पत्करलेल्या भारतीय लष्कराच्या २० जवानांची नावे देण्यात आली आहेत. दिल्ली प्रशासनाने सैन्यदलांच्या मदतीने अवघ्या १२ दिवसांत हे सुसज्ज केंद्र उभे केले आहे.

या शुश्रूषा केंद्रातील पहिल्या दोन हजार खाटा वापरासाठी लगेच उपलब्ध होणार असून त्यांचे वैद्यकीय व्यवस्थापन भारत-तिबेट सीमा पोलीस या निमलष्करी दलाचे १७० डॉक्टर व ७०० नर्स व अन्य कर्मचारी करतील. दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या ९७,२०० वर पोहोचली असताना हे केंद्र सुरू झाल्याने मोठी सोय होणार आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या