24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री ठाकरे-पवार यांच्यात वर्षावर खलबते

मुख्यमंत्री ठाकरे-पवार यांच्यात वर्षावर खलबते

एकमत ऑनलाईन

मुंबई : मनसेने मशिदीवरील भोंग्यावरून घेतलेली आक्रमक भूमिका, राणा दाम्पत्याच्या आंदोलनामुळे तापलेले वातावरण, भाजपाची वाढती आक्रमणे, यामुळे गेल्या काही दिवसांत राज्याचे राजकारण भलतेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या दोघांची तब्बल दीड तास बंदद्वार चर्चा झाली. बैठकीत प्रामुख्याने सरकारपुढील आव्हाने, कायदा व सुव्यस्थेच्या स्थितीबाबत चर्चा झाल्याचे समजते.

महाविकास आघाडीची गेल्या अडीच वर्षांची वाटचाल अडचणीतूनच सुरू आहे. त्यातच गेल्या काही दिवसांत सरकारपुढील आव्हाने वाढली आहेत. केंद्रीय यंत्रणा महाराष्ट्रात अधिकच सक्रिय असून अनेक नेत्यांच्या मागे चौकशांचा ससेमिरा लागलेला आहे. सरकारमधील दोन मंत्री तुरुंगात गेले आहेत. एका आघाडीवर त्याचा सामना करावा लागत असताना मनसेच्या बदललेल्या भूमिकेमुळे सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. मशिदीवरील भोंग्यांच्या विरोधात राज ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली असून, ३ मेपर्यंत भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालिसेचे पठण केले जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

यामुळे वातावरण तापलेले असतानाच १ मे रोजी राज ठाकरे यांची औरंगाबादला जाहीर सभा होणार असल्याने त्यात भर पडली आहे. भोंग्यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिलेला असल्याने केंद्र सरकारनेच संपूर्ण देशासाठी धोरण ठरवावे, अशी भूमिका घेऊन राज्य सरकारने हा विषय केंद्राकडे ढकलला असला तरी कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी राज्य सरकारवरच आहे. याबाबत शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते.
खा. नवनीत राणा व आ. रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्याने मागच्या आठवड्यात मुंबईत राडा झाला होता. राणा दाम्पत्याला अटक केल्यानंतर भाजपाने आक्रमक भूमिका घेतली आहे. यासंदर्भातही आजच्या बैठकीत चर्चा झाली असल्याची शक्यता आहे.इंधन दरवाढीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्य सरकारलाच जबाबदार धरले असून, केंद्राप्रमाणे कर कमी करण्याचे आवाहन केले आहे. या संदर्भातही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.

उपमुख्यमंत्री पवार गडकरींच्या भेटीला
एकीकडे शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतलेली असतानाच शुक्रवारी रात्री ८ च्या सुमारास उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या भेटीला गेले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र रात्री उशिरापर्यंत समजू शकले नाही.

 

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या